सव्वा लाखांवर एसटी कामगारांना वेतनवाढ तडजोड बैठकीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 21:40 IST2019-08-03T21:40:13+5:302019-08-03T21:40:33+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सव्वा लाख कामगारांना वेतनवाढ तडजोडीच्या बैठकीची प्रतीक्षा आहे. वेतन करारावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कामगार संघटनेने महामंडळ अध्यक्ष तथा परिवहनमंत्र्यांना जून महिन्यात पत्र दिले आहे.

सव्वा लाखांवर एसटी कामगारांना वेतनवाढ तडजोड बैठकीची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सव्वा लाख कामगारांना वेतनवाढ तडजोडीच्या बैठकीची प्रतीक्षा आहे. वेतन करारावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कामगार संघटनेने महामंडळ अध्यक्ष तथा परिवहनमंत्र्यांना जून महिन्यात पत्र दिले आहे. यावरून दीड महिन्याचा कालावधी लोटला. अद्याप तरी संघटनेला यासाठीचे निमंत्रण मिळालेले नाही.
सन २०१६ ते २०२० या चार वर्षांच्या वेतन करारासाठी जून २०१८ मध्ये चार हजार ८४९ कोटींची घोषणा करण्यात आली. रकमेच्या वितरणासाठी एसटी प्रशासनाने सूत्र दिले. जाहीर केलेल्या रकमेतून सूत्रानुसार कामगारांना पूर्ण रकमेचे वाटप होत नाही, असे कामगार संघटनेने सांगितले होते. कामगार करारावर स्वाक्षरीही करण्यात आली नाही. दरम्यान, ९ जून २०१८ रोजी झालेल्या बैठकीत चार हजार ८४९ कोटींमध्येच वेतनवाढीचा प्रस्ताव सादर करा, असा निर्णय परिवहनमंत्र्यांनी दिला होता. यानुसार संघटनेने प्रस्ताव सादर केला. त्यावर निर्णय घेण्यात आला नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करताना वार्षिक वेतनवाढ व घरभाडे भत्त्याचा जो दर लागू होईल, तोच दर एसटी कामगारांना लागू केला जाईल, असे महामंडळ अध्यक्षांनी जाहीर केले होते. केरळ दुष्काळग्रस्तांना मदतीसंदर्भात झालेल्या श्रमिक संघटनांच्या बैठकप्रसंगी कनिष्ठ वेतनश्रेणी व तीन वर्षांपेक्षा अधिक आणि पाच वर्षांपेक्षा कमी सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना चार अतिरिक्त वेतनवाढ दिली जाईल, असा निर्णय घेण्यात आला. यामुळे महामंडळावर पडणारा आर्थिक भार चार हजार ८४९ कोटींमध्येच धरला जाणार असल्याने संघटनेने दिलेल्या प्रस्तावात काही प्रमाणात घट होऊ शकते, असे गृहित धरले. दरम्यान, वेतनवाढीच्या प्रस्तावावर तडजोडीस तयार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. संघटना तडजोडीस तयार आहे, मात्र महामंडळाकडून कुठलाही प्रतिसाद नसल्याचा आरोप होत आहे. या सर्व प्रकारात वेतवाढीची कोंडी होत आहे.
महागाई भत्ता जुलैपासून लागू करा
शासन निर्णयानुसार एसटी कामगारांना १ जानेवारी २०१९ पासून वाढीव तीन टक्के महागाई भत्ता लागू करा. जुलैच्या वेतनासोबत ही रक्कम देण्यात यावी, असे पत्र महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांना कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी दिले आहे. यावर काय निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण कामगारांचे लक्ष लागले आहे.