कृषिपंपाच्या जोडण्या रखडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:39 IST2018-03-31T22:39:21+5:302018-03-31T22:39:21+5:30
गेल्या दोन वर्षापासून अर्ज करूनही तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांना अजुनपर्यंत कृषी पंपाची वीज जोडणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे सिंचन करून जास्त पीक घेण्याचे स्वप्न भंगले आहे.

कृषिपंपाच्या जोडण्या रखडल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : गेल्या दोन वर्षापासून अर्ज करूनही तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांना अजुनपर्यंत कृषी पंपाची वीज जोडणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे सिंचन करून जास्त पीक घेण्याचे स्वप्न भंगले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यावर येत्या एका वर्षात मागेल त्या शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज जोडणी देऊन शेतकऱ्यांचे सिंचन वाढवून उत्पन्नात वाढ करू, असे हिरवे स्वप्न राज्यातील शेतकऱ्यांना शासनाने दाखविले. वीज मंडळाकडून तत्काळ वीज जोडणी मिळणार, या आशेवर तालुक्यातील जवळपास ५०० शेतकऱ्यांनी सन २०१६ मध्ये वीज वितरण कंपनीकडे कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी डिमांड भरले होते. परंतु या शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षापासून कृषी पंपाची वीज जोडणी मिळाली नाही. यासंदर्भात अनेकदा शेतकऱ्यांनी वीज मंडळाच्या कार्यालयात चकरा मारून साहेब जोडणी कधी मिळणार, याची चौकशी केली. परंतु वेळोवेळी कार्यालयाती कर्मचाऱ्यांनी वरून आदेश नाही, टेंडर मिळाले नाही, मार्चपर्यंत टेंडर निघणार, असे मोघम स्वरूपातील उत्तरे शेतकऱ्यांना देण्यात आली. आता मार्च संपला तरी वीज कंपनीने कृषी पंपाचे टेंडर अजुनपर्यंत काढले नसल्याची माहिती वीज कार्यालयाकडून देण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांचे स्वप्न हवेतच विरण्याची चिन्हे असून लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन गेल्या दोन वर्षापासून रखडलेले कृषी पंपाची वीज जोडणी करावी, अशी मागणी होत आहे.