ज्ञानरचनावाद संकल्पनेने घोकमपट्टी बाद
By Admin | Updated: December 5, 2015 09:08 IST2015-12-05T09:08:57+5:302015-12-05T09:08:57+5:30
ग्रामीण मुलांना मुक्त वातावरणात शिक्षण देण्यासाठी ज्ञानरचनावाद संकल्पनेचा यशस्वी प्रयोग केला जात आहे.

ज्ञानरचनावाद संकल्पनेने घोकमपट्टी बाद
सातारातील कुमठेबी पॅटर्न : पोडावरच्या शाळांसाठी गुणवत्ता विकास कार्यक्रम
यवतमाळ : ग्रामीण मुलांना मुक्त वातावरणात शिक्षण देण्यासाठी ज्ञानरचनावाद संकल्पनेचा यशस्वी प्रयोग केला जात आहे. सातारा जिल्ह्यातील ही संकल्पना दुर्गम भागातील पोडावरच्या शाळांसाठी जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत १८ शाळांवर याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. रटाळ अध्यपनाला फाटा देत घोकमपट्टी बाद केली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी पोड शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम हाती घेतला आहे.
सातारा जिल्ह्यातील ही यशस्वी संकल्पना आत्मसात करण्यासाठी वडगाव येथील केंद्रप्रमुख थोटे यांनी काही शिक्षकांसह कुमठेबीट येथील शाळेला भेट दिली. त्यानंतर हा प्रयोग वडगाव केंद्रातील शाळांमध्ये राबविण्यात आला. ज्ञानरचनावदामुळे विद्यार्थ्यांना पाठांतर करण्याची गरज नाही. शिवाय पारंपारिक फळा, खडू आणि छडी ही संकल्पनाच वर्गखोलीतून बाद होणार आहे.
मुलांना प्रत्येक विषयांचा टास्क देऊन शिक्षक केवळ मार्गदर्शकांच्या भुमिके वावरणार आहे. ज्ञानरचना पध्दतीमुुळे विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच स्वयंअध्ययनाचा अनुभव घेता येणार आहे. हा प्रयोग यवतमाळ तालुक्यातील कारली येथील पोडावरच्या शाळेत करण्यात आला. त्याचे आश्चर्यकारक असे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी खुद्द अध्यक्ष फुपाटे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांनी या शाळेला भेट दिली. पहिलीतील मुले बेरीज, वजाबाकी करून दाखवित होते. त्यांना अक्षर ज्ञानही चांगले होते. वर्गात मुलांचा गोंधळ नव्हता प्रत्येक जण त्याला आवडेल त्या वस्तूंचा वापर करून ज्ञानार्जन करत होते. त्यामुळेच हा प्रयोग पहिल्या टप्प्यात सर्वच दुर्गम भागातील शाळांमध्ये राबविण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी दिले. याची लागलीच अंमलबजावणीसुध्दा केली जात आहे.
प्रशिक्षण झालेल्या शिक्षक व केंद्र प्रमुखांकडून इतरांना प्रशिक्षित केले जाणार आहे. ज्या शिक्षकांना नवीन काही करण्याची उर्मी आहे, अशांची निवड करून ही ज्ञानरचनावाद संकल्पना राबविली जाणार असल्याचे अध्यक्ष फुपाटे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण पध्दतीत ज्ञानरचनावादामुळे एक नवीन क्रांती होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)