यवतमाळमधील आदिबा अहमद बनेल महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयएएस
By शुभांगी काळमेघ | Updated: April 22, 2025 18:30 IST2025-04-22T18:27:44+5:302025-04-22T18:30:09+5:30
युपीएससी सीएसई २०२४ निकाल जाहीर : महाराष्ट्रातील अर्चित डोंगरे देशात तिसरा

Adiba Ahmed from Yavatmal will become the first Muslim woman IAS officer in Maharashtra
यवतमाळ :केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल (२०२४) आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर upsc.gov.in जाहीर करण्यात आला आहे. देशात अतिशय प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारल्याचं दिसत आहे. देशात शक्ती दुबे यांनी अव्वल स्थान पटकावले. तर दुसऱ्या क्रमांकावर हर्षिता गोयल आहे. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे पुण्यातील अर्चित डोंगरे देशात तिसरा आला. तर आदिबा अहमद महाराष्ट्रातून पहिली मुस्लिम महिला आयएएस बनण्याची शक्यता आहे. आदिबाने भारतातून १४२ वी रँक प्राप्त केली आहे.
आदिबा अनम अश्फाक अहमद यवतमाळ जिल्ह्यातील रहिवाशी आहे. यापूर्वी आदिबाने मुलाखत दिली होती पण तिची अंतिम निवड झाली नव्हती. परंतु या प्रयत्नात तिची अंतिम यादीत निवड झालेली आहे आणि तिची १४२ वी रँक असल्याने तिला आयएएस पोस्ट मिळण्याची दाट शक्यता आहे. आदिबाचे हे यश जिल्ह्यातील मुलींना प्रेरणादायी आहे.
आयोगाने अंतिम निकालात १००९ उमेदवारांची निवड केली. त्यामध्ये, ३३५ सर्वसाधारण, १०९ ईडब्लूएस, ३१८ ओबीसी, १६० एससी, ८७ एसटी प्रवर्गातील उमेदवार आहेत. महाराष्ट्रातील अर्चित डोंगरे देशात तिसरा आला असला तरी महाराष्ट्रातून तो पहिला आला आहे. ठाण्यातील तेजस्वी देशपांडे हिने देशातून ९९ वा क्रमांक पटकावला असून ठाण्याच्याच अंकिता पाटीलने ३०३ वा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे, मुलींनी देखील यंदाच्या परीक्षेत आपली सरशी दाखवून दिलीय.