मालमत्ता करावरची अतिरिक्त व्याजमाफी विचाराधीन

By Admin | Updated: February 1, 2015 23:05 IST2015-02-01T23:05:00+5:302015-02-01T23:05:00+5:30

नगरपरिषद क्षेत्रात जवळपास ३१ हजार मालमत्ताधारक आहेत. चुकीच्या सर्वेक्षणामुळे अनेकांना अवाजवी कर आकरणी झाली. या थकित करावर मोठ्या प्रमाणात व्याज लागले आहे.

Additional interest assessment on property tax under consideration | मालमत्ता करावरची अतिरिक्त व्याजमाफी विचाराधीन

मालमत्ता करावरची अतिरिक्त व्याजमाफी विचाराधीन

यवतमाळ : नगरपरिषद क्षेत्रात जवळपास ३१ हजार मालमत्ताधारक आहेत. चुकीच्या सर्वेक्षणामुळे अनेकांना अवाजवी कर आकरणी झाली. या थकित करावर मोठ्या प्रमाणात व्याज लागले आहे. हे व्याज माफ करण्याचा ठराव मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवला जात आहे. याशिवाय यवतमाळातील विकासकामांना मंजुरीसह तब्बल ७३ विषयांवर चर्चा होणार आहे.
नव्या वर्षातील नगरपरिषदेची ही पहिलीच सर्वसाधारण सभा आहे. आर्थिक वर्ष संपत असल्याने नियोजित कामांना मंजुरी प्रदान करून घेणे. तसेच झालेल्या कामांसाठी कार्योत्तर मंजुरी देणे असे विषय ठेवण्यात आले आहे. यामध्ये शहरवासियांना दिलासादायक निर्णय होण्याची शक्यता आहे. थकित मालमत्ता करावर आकारलेले व्याज माफ करणे नगरपरिषदेच्या विचाराधीन आहे. याशिवाय शहरातील महिलांची होणारी कुचंबना थांबविण्यासाठी मुख्य बाजारपेठांमध्ये स्त्रियांसाठी प्रसाधनगृह उभारण्याच्या कामालाही मंजुरी दिली जाणार आहे. शिवाय सर्वजनिक प्रसाधनगृहाच्या दुरूस्तीचा ठराव घेतला जाणार आहे. या बैठकीत दलितवस्तीतून प्रस्तावित असलेल्या विविध भागातील विकासकामांना मंजुरी देण्यात येणार आहे. यात रस्ता क्राँक्रीटीकरण, नाली बांधकाम समाविष्ट केले आहे. विद्युत पथदिवे लावणे, काही पथदिव्यांची दुरूस्ती करणे, दाते कॉलेज ते शिवाजी नगरपर्यंत विद्युत पोल काढून भूमिगत केबल टाकण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात येणार आहे. याशिवाय नगरपरिषदेतील वाहनांच्या दुरुस्ती खर्चास मंजुरी अशा अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. काही झालेल्या कामांना कार्योत्तर मंजुरी देण्यात येणार आहे.
महिला बाल कल्याण समिती अंतर्गत लघुउद्योगाच्या प्रशिक्षणाकरिता निविदा प्रक्रिया राबवून येणाऱ्या खर्चास आर्थिक व प्रशासकीय मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. दत्तचौक ते महिला अणे महाविद्यालयापर्यंत केलेला रस्ता, गार्डन रोडवरील पुलाचे बांधकाम, आयुर्वेदिक दवाखान्यातील दुरूस्तीचे काम याला वाढीव परिणामांसह खर्चास मंजुरीसाठी सभागृहात ठेवण्यात येणार आहे.
अनेक भागातील पथदिवे बंद असून, तेथे नवीन ट्युबशेडची खरेदी केली जाणार आहे. सेवानिवृत्तीने रिक्त झालेल्या सफाई कामागारांच्या जागेवर लाड कमिटीच्या शिफारशीनुसार वारसदारांना नियुक्ती देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. शहरातील घन कचऱ्याच्या कंत्राटाला झोननिहाय मंजुरी दिली जाणार आहे. यामुळेच सुलभ शौचालय सफाईचे कंत्राट, वार्डातील नाल्या काढणे, ४५ हातगाड्याच्या माध्यमातून कचरा उचलणे अशा विविध कंत्राटांना वाढीव मुदत वाढ देण्यात येणार आहे.
नवीन वर्षातील ही पहिलीच सभा असल्याने सर्वांनाच यामध्ये महत्वपूर्ण आणि शहर विकासाच्या दृष्टीने आवश्यक असे निर्णय घेतले जातील अशी आशा लागली आहे.
(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Additional interest assessment on property tax under consideration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.