यवतमाळ जिल्ह्यात पाणी पेटलं; पाण्यासाठी महिलांची वणवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 16:53 IST2019-05-15T16:52:37+5:302019-05-15T16:53:33+5:30
40 गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई

यवतमाळ जिल्ह्यात पाणी पेटलं; पाण्यासाठी महिलांची वणवण
यवतमाळ : मे महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यात पाणीटंचाईचा भडका उडाला आहे. पुसद तालुक्यातील माळपठार परिसरात पाण्यासाठी महिला व नागरिकांना दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. ४० गावांमध्ये तीव्र पाणी समस्या निर्माण झाली आहे.
पुसद तालुक्यातील माळपठार परिसराला दरवर्षी पाणीटंचाईचे चटके सोसावे लागतात. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. या परिसरातील हिवळणी, कुंभारी, आपटी, मासळी, पन्हाळा, म्हैसमाळ या भागातील विहिरी कोरड्या पडल्या आहे. काही ठिकाणी टँकरचे पाणी विहिरीत टाकले जाते. ते पाणी उपसण्यासाठी विहिरीवर प्रचंड गर्दी होत आहे. गावांमध्ये पाण्यासाठी भांडणे होत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.
जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईमुळे सध्या २३ टँकर सुरू झाले आहे. माळपठार परिसरातील म्हैसमाळ येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र टँकर चालकाची मनमानी सुरू असल्याने महिलांना रात्री-अपरात्री पाणी भरावे लागत आहे. या गावात दररोज दोन टँकर येतात. त्यापैकी एक दिवसा तर दुसरा टँकर रात्री येतो. पन्हाळा येथील विहिरी कोरड्या पडल्या. कुंभारी येथील विहिरी आटल्याने नागरिकांना कूपनलिकेचे फ्लोराईडयुक्त पाणी प्यावे करावे लागत आहे. या परिसरातील ४० गावांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.