लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा युवकाने केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 17:30 IST2025-04-23T17:29:32+5:302025-04-23T17:30:27+5:30
महिलेच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलले : मारेकऱ्याला अटक

A young man killed his girlfriend who was insisting on marriage.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : येथील इस्तारीनगर खापरीतील एका घरात सोमवारी सकाळी ०९:०० वाजेच्या सुमारास महिलेचा संशयास्पदस्थितीत मृतदेह आढळला होता. महिलेचा मृत्यू नेमका कशाने झाला, याचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले होते. पोलिसांनी तपासचक्रे फिरवून अवघ्या २४ तासांत हे प्रकरण खुनाचे असल्याचे उघड केले. अनैतिक संबंधातून प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
अजय नेवारे (वय ३५, रा. कोंडजई), असे मारेकऱ्याचे नाव आहे. त्याने प्रीती सचिन डाखरे (वय २८, रा. इस्तारीनगर, खापरी) या महिलेची हत्या केली. महिलेच्या पतीचा नऊ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. ती मुलगा अंश याच्यासह सरला श्रावण मडावी यांच्या घरी भाड्याने राहत होती, तसेच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करीत होती. २१ एप्रिल रोजी सकाळी महिलेचा घरातच मृतदेह आढळून आला. घरमालकीण सरला मडावी यांनी याची माहिती त्या महिलेचे वडील हनुमान बदकी, रा. वासरी यांना फोनवरून दिली. त्यावरून मृतक महिलेचे वडील, बहिणी व जावयांनी घटनास्थळ गाठले. हनुमान बदकी यांनी घाटंजी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली.
आरोपी कंत्राटी कामगार
आरोपी अजय हा सात ते आठ वर्षांपासून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. त्याने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. अधिक तपास घाटंजी पोलिस करीत आहेत.
घाटंजीतील घटनेत मानेवर पाय ठेवून घोटला गळा
घाटंजी शहरात मंगळवारी सकाळी महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले. या महिलेचे प्रेमसंबंध होते. यातूनच ही हत्या झाल्याचा संशय घाटंजी पोलिसांना आला. त्यांनी आरोपी प्रियकराला ताब्यात घेऊन चौकशी करताच त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. प्रेयसीकडून लग्नासाठी तगादा लावला जात होता. त्यातच दुसरीकडे लग्न जुळल्याने हे शक्य नव्हते. यावरून सोमवारी सकाळी दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात प्रेयसीच्या गळ्यावर पाय ठेवून तिचा गळा घोटल्याची कबुली आरोपीने दिली, अशी माहिती घाटंजी ठाणेदार नीलेश सुरडकर यांनी 'लोकमत'ला दिली.