बंद फ्लॅटमध्ये आढळला युवतीचा संशयास्पद मृतदेह, वणीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 16:16 IST2023-05-30T16:15:22+5:302023-05-30T16:16:25+5:30
डोक्यावर जखमा, पोलिसांना घातपाताची शंका

बंद फ्लॅटमध्ये आढळला युवतीचा संशयास्पद मृतदेह, वणीतील घटना
वणी (यवतमाळ) : शहरातील जैन लेआऊट परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये बंद खोलीत युवतीचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता ही घटना उजेडात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृत तरुणीच्या डोक्यावर जखमा असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. एकूणच घटनास्थळावरील परिस्थिती लक्षात घेता, तरुणीचा घातपात तर करण्यात आला नाही ना, अशी शंका पोलिसांना असून त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
प्रिया रेवानंद बागेसर (वय २५) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती कृष्णा अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक चारमध्ये किरायाने राहत होती. सोमवारी सकाळी या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना शंका आली. यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार प्रदीप सिरस्कर व त्यांचे सहकारी घटनास्थळावर दाखल झाले. त्यावेळी रूमच्या दाराची कडी बाहेरून लावलेल्या स्थितीत होती. पोलिसांनी दार उघडून बघितले असता, जमिनीवर तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. यावरून दोन ते तीन दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले. प्रिया बागेसर ही तरुणी वरोरा येथील एकर्जुना रोडवर असलेल्या एका वसाहतीत राहत होती. मात्र, काही दिवसांपासून ती वणीत वास्तव्याला होती. सोमवारी तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तिने आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला, हे प्रश्न सध्या अनुत्तरित असले तरी घातपाताच्या शंकेवरून पोलिसांनी आपला तपास त्या दिशेने फिरविला आहे. घातपात केला असेल, तर तो नेमका कुणी केला, घातपाताचे कारण काय, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान वणी पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
तरुणीची दोन नावे
मृत प्रिया बागेसर ही वणीत आरोही वानखेडे या नावाने वावरत होती. ती येथे नाव बदलून का राहत होती, हादेखील तपासाचा भाग ठरला आहे. सायंकाळपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन झाले नव्हते. शवविच्छेदन अहवालानंतर प्रियाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे रहस्य उलगडणार आहे.