यवतमाळमध्ये २००२ च्या पूराची पुनरावृत्ती? १९ हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान, २७ जनावरांचे बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 20:23 IST2025-08-20T20:23:12+5:302025-08-20T20:23:52+5:30

१९ हजार हेक्टरचे नुकसान, २७ जनावरांचा मृत्यू, ५५ घरांची पडझड : उमरखेड तालुक्यातील दोन गावांचा संपर्क तुटला, झरी आणि वणीमधील वाहतूक ठप्प, ५० कुटुंबांची घरे पाण्यात, २२० जणांनी घेतला नातेवाइकांकडे आश्रय, आपत्ती व्यवस्थापनाची टीम दाखल

A repeat of the 2002 floods in Yavatmal? Crop damage on 19 thousand hectares, 27 animals killed | यवतमाळमध्ये २००२ च्या पूराची पुनरावृत्ती? १९ हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान, २७ जनावरांचे बळी

A repeat of the 2002 floods in Yavatmal? Crop damage on 19 thousand hectares, 27 animals killed

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
जिल्ह्यात गत चार दिवसांपासून जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. झालेल्या अतिवृष्टीने नदीकाठच्या शेत शिवारातील १९ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर या अतिवृष्टीत २७ जनावरांचा मृत्यू झाला. ५५ घरांची पडझड झाली आहे. मंगळवारी दिवसभर झालेल्या पावसाने उमरखेड तालुक्यातील दोन गावांचा संपर्क तुटला, तर झरी आणि तणी तालुक्यातील काही गावामधील वाहतूक ठप्प झाली होती.


जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गत चार दिवसांपासून धुंवाधार पाऊस सुरु आहे. या पावसाने मंगळवारी उमरखेड, द्वारी आणि वणी तालुक्यात चांगलाच कहर केला. अति पावसाने उमरखेड तालुक्यातील पळशी आणि चिंचोली संगम या गावांचा संपर्क तुटला होता, तर पुलावरून पाणी वाहत असल्याने हारी तालुक्यातील मांडवी ते बोरी हा रस्ता बंद होता. वणी तालुक्यातील बोरी ते मूर्ती आणि शिवणी ते चिंचोली हा मार्ग बंद राहिला. यामुळे या भागातील वाहतूक खोळंबली होती.


१० महसूल मंडळात झाली अतिवृष्टी नोंद
सकाळी १० पर्यंत जिल्ह्यात सरासरी ३५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसाने १० महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद केली. पूरपरिस्थितीत २७ जनावरांचा मृत्यू झाला, तर अति पावसाने ५५ घरांची पडझड झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरू आहे.


३५ मिमी पावसाची झाली नोंद
यवतमाळ ३३ मिमी, बाभुळगाव २८, कळंब ३१, दारव्हा २८, दिग्रस ५०, आर्णी ३१, नेर ३०, पुसद २८, उमरखेड ४१, महागाव ४६, वणी ३९, महागाव ३०, झरी जामणी ५०, केळापूर ४३, घाटंजी ३०, तर राळेगावमध्ये २४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गत २४ तासात जिल्ह्यात सरासरी ३५ मिमी पाऊस झाला.


आधीच पूर त्यात प्रकल्पाचे पाणी
ईसापूर धरणाचे १३ गेट उघडण्यात आले आहे. या ठिकाणावरून ७४ हजार २८४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी पैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्यात आले. यामुळे या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. महागाव तालुक्यातील अथरपूस प्रकल्पाचे १० गेट ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. अडाण प्रकल्पाचे पाच गेट उघडण्यात आले आहेत. बेंबळा प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. या ठिकाणावरून २५ सेंटीमीटरने पाण्याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात सुरू आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे ३ दरवाजे उघडले. या ठिकाणावरून वर्धा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे.


२००२ च्या पूरपरिस्थितीची पुनरावृत्ती

  • उमरखेड तालुक्यात २००२ मध्ये मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तब्बल २३ वर्षानंतर तालुक्यात सततच्या पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. चार ते पाच दिवसांपासून तालुक्यात पावसाने थैमान घातल्याने अश्रूचा पूर वाहत आहे.
  • उमरखेड तालुक्यातील पळशी गावाला पुराचा वेढा बसला आहे. या ठिकाणच्या ४० कुटुंबाला शाळेमध्ये हलविण्यात आले आहे. याशिवाय एनडीआरएफची टीम या ठिकाणी तैनात ठेवण्यात आली आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना होणार आहे.


बाधित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले
पूरपरिस्थितीत अडकलेल्या २२० बाधित नागरिकांनी नातेवाइकांकडे आश्रय घेतला. इतर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. गृहोपयोगी साहित्याची नासधूस झाली.

Web Title: A repeat of the 2002 floods in Yavatmal? Crop damage on 19 thousand hectares, 27 animals killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.