उभ्या ट्रकला दुचाकी धडकली; दोन ठार, एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 20:22 IST2023-03-25T20:21:54+5:302023-03-25T20:22:45+5:30
ही दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आबई फाट्यावर घडली.

उभ्या ट्रकला दुचाकी धडकली; दोन ठार, एक गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क, वणी (यवतमाळ): रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मोटारसायकल धडकून झालेल्या भीषण अपघातात दोनजण ठार, तर एक गंभीररीत्या जखमी झाला. ही दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आबई फाट्यावर घडली.
अतुल विलास डाखरे (वय २५) व अजय किशोर घुगूल (२५) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात दिनेश खुशाल वाघाडे हा गंभीर जखमी झाला. हे तिघेही वणी तालुक्यातील येनक येथील रहिवासी आहेत. कायरजवळील बोपापूर येथील साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून हे तिघे दुचाकीने येनक येथे परत जात होते. शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आबई फाटा येथील रेड्डी जिनिंगजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हायवा ट्रकवर त्यांची दुचाकी आदळली. या अपघातात अतुल डाखरे, दिनेश वाघाडे व अजय घुगुल हे तिघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच येनक येथील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने एका खासगी वाहनाद्वारे तिघांनाही चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अतुल डाखरे व अजय घुगुल यांचा मृत्यू झाला, तर दिनेश वाघाडे याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंढरी रामचंद्र डाखरे यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी एम.एच.३४-बी.जी.३२१८ क्रमांकाच्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.