रस्ता अपघातात ५९ दिवसांत ८३ जणांचा गेला बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 18:46 IST2025-03-17T18:45:43+5:302025-03-17T18:46:13+5:30
Yavatmal : ३७ अपघात पांढरकवडा उपविभागात झाले आहेत.

83 people died in road accidents in 59 days
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत. येथे सातत्याने अपघात होत असून, जीवितहानी होत आहे. जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यांत १५६ अपघात घडले असून, यात ५९ दिवसांत ८३ जणांचा बळी गेला आहे. तर ९५ जण गंभीर जखमी आहेत. अपघातामध्ये घरातील कर्ती व्यक्तीच निघून जाते. त्यामुळे याचा मोठा परिणाम त्या कुटुंबाच्या भविष्यावर होतो. पर्यायाने सामाजिक नुकसानही होत आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे.
रस्त्यांचा आकार वाढत असतानाच वाहन संख्याही त्याच पटीने वाढली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची वाढ होऊ लगाली आहे. स्वतःची दुचाकी, चारचाकी आता प्रत्येकाची गरज बनली आहे. अशा स्थितीत वाहतूक नियमांचे पालन होत नाही. यातून भीषण अपघात घडत आहेत. रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम यांचा केवळ गाजावाजा केला जातो. परिवहन विभाग, वाहतूक पोलिस केवळ दंडात्मक कारवाईतून शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतरही याचा परिणाम दिसत नाही. अपघातातून ओढावलेला मृत्यू टाळता येणे शक्य आहे. यासाठी अजूनही मोठे काम होण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील पोलिस उपविभागनिहाय आकडेवारी पाहता पांढरकवडा येथे सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण आहे. येथे दोन महिन्यांत ३७ अपघातांत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. २० जण जखमी झाले आहेत.
अतिवेगाने अपघात
राष्ट्रीय महामार्गावर प्रमाण अधिक चौपदरी असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वेगमर्यादा पाळली जात नाही. अनेक गावाजवळ विरुध्द दिशेने प्रवास केला जातो. येथेच अपघाताचे प्रमाण अधिक आहे. त्यातील मृत्यूदरही जास्त आहे. जिल्ह्यातून जाणारे दोन राष्ट्रीय महामार्गावर हे प्रमाण जास्त दिसते.
उपविभागनिहाय अपघात
उपविभाग अपघात मृत्यू जखमी
यवतमाळ ३६ १५ ३४
पांढरकवडा ३७ २२ २०
वणी १७ १३ १२
पुसद २४ १२ ०८
उमरखेड ११ ०५ ०६
दारव्हा ३१ १६ १५
एकूण १५६ ८३ ९५