जिल्ह्यातील ७७ टक्के विद्यार्थी गणितामध्ये कच्चे; काय म्हणतोय, 'असर'चा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 18:05 IST2025-02-10T18:05:20+5:302025-02-10T18:05:48+5:30

शिक्षकांना दाखविला आरसा : अध्ययनाची ठरवावी लागणार दिशा

77 percent of students in the district are poor in mathematics; What does the 'Asr' report say? | जिल्ह्यातील ७७ टक्के विद्यार्थी गणितामध्ये कच्चे; काय म्हणतोय, 'असर'चा अहवाल

77 percent of students in the district are poor in mathematics; What does the 'Asr' report say?

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासंदर्भात 'असर २०२४'चा अहवाल समोर आला आहे. असरच्या अहवालाने शिक्षकांना आरसाच दाखविला असून, आत्मचिंतन करून अध्ययन व अध्यापनाची दिशा ठरवावी लागणार आहे. तर, अप्रगत असलेले विद्यार्थी प्रगत होऊन पुढे येऊ शकतात.


तिसरी ते पाचवीच्या ६३ टक्के विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. तर, इयत्ता पाचवी ते आठवीच्या ७७ टक्के विद्यार्थी गणितात कच्चे आहेत. शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता व प्राथमिक शिक्षणाची स्थिती जाणून घेण्यासाठी 'असर'च्या वतीने दरवर्षी सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येते. या सर्वेक्षणात ३ ते १६ वयोगटातील शालेय मुलांची आणि ५ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांच्या भाविक आणि गणितीय ज्ञानाची तपासणी करण्यात येते. तिसरी ते पाचवी आणि पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जातो. २०२४ मध्ये राज्यात असरकडून मुलांच्या शिक्षण पातळीचे मूल्यमापन करण्यात आले. यात जिल्ह्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात आले. सहा ते १४ वयोगटातील ६१.१ विद्यार्थी सरकारी शाळेत शिक्षण घेत आहे. तर, ०.३ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचेही नमूद आहे.


शिक्षकांनी असरच्या अहवालाकडे सकारात्मक दृष्टीने बघावे, त्यातून आपल्या अध्ययनाची दिशा निश्चित करावी. तरच पुढील काळात विद्यार्थ्यांमध्ये प्रगती झाल्याचे दिसून येईल. त्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सरकारी शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी काही बाबींची गरज आहे. 


जिल्हा गुणवत्तेत माघारला

  • जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये जिल्हा माघारल्याचे 'असर'च्या अहवालातून दिसून येत आहे. इयत्ता पाचवी ते आठवीच्या ४८ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचे पुस्तक व्यवस्थित वाचता आले नाही. याचबरोबर ७७टक्के विद्यार्थ्यांना गुणकार आणि भागाकार करता येत नसल्याचे अहवालात दिसून येत आहे.
  • असरने जिल्हा परिषद, नगरपालिका, आश्रमशाळा, अनुदानित शाळा येथील विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता तपासणी केली. यात मुलांचे मराठी वाचन, गणित कच्चे असल्याचे आढळून आले.
  • यामुळे सरकारी शाळांतील शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मात्र हा अहवालही काहीसा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मात्र असरच्या अहवालाला सकारात्मक दृष्टीने बघणे आवश्यक आहे.


कार्ये व उद्दिष्टे काय?
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबाबत प्रगती जाणून घेण्यासाठी असर सर्वेक्षण दरवर्षी केले जाते. या माध्यमातून विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता तपासणे प्रमुख उद्देश आहे. शिक्षकांनी उणीवा ओळखून त्यात बदल करणे अपेक्षित आहे. अभ्यासात अप्रगत असलेल्या विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी अधिक काळजी घेतल्यास तेच विद्यार्थी प्रगत होतील.


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम कधीपासून?
२०१४ मध्ये राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. २०१८-१९ पर्यंत हा कार्यक्रम निरंतर चालला. मात्र, कोविड काळात याला ब्रेक बसला. मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता जाणून घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.


किती टक्के मुलांना जमते मराठी, गणित
इयत्ता तिसरी ते पाचवीच्या केवळ ३७.९ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचे मराठी पुस्तक वाचता येते. तर, ३१.१ टक्के विद्यार्थ्यांना गणित येते. तर पाचवी ते आठवीच्या ५२.३ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचे मराठी पुस्तक वाचता येते. केवळ २३ टक्के विद्यार्थ्यांना गणिताचा हिशोब करता येतो.


६३ टक्के
विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही. तर पाचवी ते आठवीचे ७७टक्के विद्यार्थी गणितात कच्चे असल्याचे समोर आले आहे.


"असर'चा सर्वेमुळे शिक्षकांनी निराश न होता आपल्या अध्ययन व अध्यापनाची दिशा निश्चित केली पाहिजे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यात मदत होणार आहे. याकडे सकारात्मक बघावे."
- डॉ. प्रशांत गावंडे, प्राचार्य, डायट,

Web Title: 77 percent of students in the district are poor in mathematics; What does the 'Asr' report say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.