अपंगांचे पाच हजार बोगस प्रमाणपत्र रद्द
By Admin | Updated: December 3, 2015 02:46 IST2015-12-03T02:46:40+5:302015-12-03T02:46:40+5:30
राज्य शासनाने बोगस अपंगत्व प्रमाणपत्रे रोखण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया सक्तीची केली आहे. यात एकट्या यवतमाळ जिल्ह्यात तब्बल पाच हजार प्रमाणपत्र बोगस आढळले..

अपंगांचे पाच हजार बोगस प्रमाणपत्र रद्द
तालुकास्तरावर केंद्रच नाही : आॅनलाईन अर्जासाठी वेटिंग
रूपेश उत्तरवार यवतमाळ
राज्य शासनाने बोगस अपंगत्व प्रमाणपत्रे रोखण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया सक्तीची केली आहे. यात एकट्या यवतमाळ जिल्ह्यात तब्बल पाच हजार प्रमाणपत्र बोगस आढळले असून ते रद्द करण्यात आले आहे. नव्याने प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात केंद्र उघडण्याच्या सूचना आहेत. मात्र जिल्ह्यात मुख्यालयीच केंद्र आहे. एकाच ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक उमेदवार आहेत. या प्रक्रियेसाठी सहा महिन्यांचे वेटिंग आहे.
अपंगांच्या आॅनलाईन प्रक्रियेसाठी संपूर्ण राज्यात विशेष मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात अपंगांच्या तपासणीसाठी केंद्र उघडण्याच्या सूचना आहेत. मात्र या ठिकाणी डोळे, आॅर्थोपेडिक, न्यूरोसर्जन, गायनिक, नाक-कान-घसा आणि मेडीसिनचे डॉक्टर नाहीत. यामुळे जिल्हा मुख्यालयीच अपंगांच्या नोंदणीचे केंद्र उघडण्यात आले आहे.
जिल्ह्यात अपंगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यामुळे दर आठवड्याला मोठ्या प्रमाणात अपंग जिल्हा मुख्यालयी नोंद करण्यासाठी येतात. प्रत्येक अपंग व्यक्तीला आलेल्या दिवशी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. त्यासाठी तपासणी आणि विविध मते घेण्यासाठी पुढची तारीख घेतली जाते. प्रत्येक दिवशी केवळ २० ते २५ अपंगांची तपासणी शक्य होते. मात्र अनेक व्यक्ती दिलेल्या तारखेला पोहोचत नाही. यामुळे ६० उमेदवारांना पुढच्या तारखेला बोलावले जाते. त्यांची तपासणी करण्यात येते. प्रत्यक्षात जास्त उमेदवार आल्यास अनेकांना परत जावे लागते. यामुळेच तपासणीसाठी अनेक अपंग ‘वेटिंग’वर आहेत. सध्या सहा महिन्यांची ‘वेटिंग लिस्ट’ आहे. आजच्या तारखेत नोंद केल्यास जून २०१६ मधील १ तारखेलाच त्याची तपासणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे अपंगांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. याच सुमारास विविध योजनेत आॅनलाईन अपंग प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. प्रमाणपत्र आॅनलाईन नसल्याने त्यांना मदतीस मुकावे लागत आहे.
अपंगांना मिळणाऱ्या सवलती लक्षात घेत धडधाकट व्यक्तींनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविले आहेत. सध्याच्या आॅनलाईन प्रक्रियेने हे वास्तव उघड केले आहे. यात तब्बल पाच हजार प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहेत. तर चार हजार अपंगांना प्रमाणपत्र मिळाले आहे. जवळपास पाच हजार उमेदवार अपंगत्व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रतीक्षा यादीत आहेत. अनेक अपंग अजूनपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत पोहोचले नाही.