दुर्दैवी! यवतमाळ येथे रेल्वे पुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून ४ मुलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 20:54 IST2025-08-20T20:54:15+5:302025-08-20T20:54:51+5:30
घटनेची माहिती शहरात पसरताच रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती

दुर्दैवी! यवतमाळ येथे रेल्वे पुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून ४ मुलांचा मृत्यू
दारव्हा (यवतमाळ) : येथील रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेच्या पुलासाठी खाेदण्यात आलेल्या खड्ड्यात पाेहाेण्यासाठी उतरलेली चार मुले बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्याने चारही मुलांना बाहेर काढण्यात आले. मात्र या चारही मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रिहान असलम खान (वय १३), गोलू पांडुरंग नारनवरे (वय १०), सोम्या सतीश खडसन (वय १०), वैभव आशिष बोधले (वय १४) सर्व रा. दारव्हा अशी मृतांची नावे आहेत. शहरात वर्धा–नांदेड रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. दारव्हा–नेर मार्गावर रेल्वे उड्डाण पुलासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. पावसामुळे या खड्डयात मोठ्या प्रमाणावर पाणी भरले आहे. बुधवारी सायंकाळी चारही मुले खड्डयात आंघोळीसाठी उतरली. मात्र पोहता न आल्याने चारही मुले गाळात अडकली आणि पाण्यात बुडू लागली. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी आरडाओरड ऐकून घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक युवकांनी शर्थीचे प्रयत्न करून मुलांना बाहेर काढले. त्यांना तत्काळ दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, घटनेची माहिती शहरात पसरताच रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तणाव निवळला. चारही मुलांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा हाेत नसल्याने ऑक्सिजन लावून पुढील उपचारासाठी यवतमाळला रेफर केले. मात्र या दरम्यान चाैघांचाही मृत्यू झाला. दाेन रुग्णवाहिकेने चारही मुलांचे मृतदेह यवतमाळ येथून दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात रात्री ९ वाजेच्या सुमारास आणण्यात आले हाेते. यावेळी नागरिकांनी रुग्णालय परिसरात माेठी गर्दी केली हाेती.