यवतमाळात ३२ लाखांची संशयास्पद रोकड जप्त, चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 17:27 IST2018-03-08T17:27:09+5:302018-03-08T17:27:09+5:30
तवेरा वाहनातून यवतमाळ शहरात येणारी ३२ लाख रुपयांची संशयास्पद रोकड बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास लगतच्या मोहा फाटा येथे पोलिसांनी जप्त केली.

यवतमाळात ३२ लाखांची संशयास्पद रोकड जप्त, चौघांना अटक
यवतमाळ : तवेरा वाहनातून यवतमाळ शहरात येणारी ३२ लाख रुपयांची संशयास्पद रोकड बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास लगतच्या मोहा फाटा येथे पोलिसांनी जप्त केली. या रकमेबाबत कुठलाही अधिकृत पुरावा देऊ न शकल्याने वाहनातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथून यवतमाळकडे एम.एच.१८-डब्ल्यू-५५३४ हे तवेरा कार येत होती. तपासणीसाठी मोहा फाट्यावर टोळीविरोधी पथकाने कार थांबविली. तपासणी केली असता प्लास्टिकच्या पोत्यात ३२ लाख १३ हजार ८०० रुपयांची रोकड आढळून आली. यात दोन हजार, पाचशे, दोनशे व १०० रुपयांच्या नोटांचे बंडल होते. या रकमेबाबत वाहनातील राजेश रामलू बत्तीनीवार (४०) रा. चनाखा ता. पांढरकवडा, श्रीहरी लिंगय्या यादगीरीवार (५७) रा. शिरपूर जि. धुळे, देवराव आसन्ना रोडडावार (३३) रा. चनाखा ता. पांढरकवडा, बालराज राजेय्या कंकेटीवार (३८) रा.पेददाकोडू जि. सिंददीपेठ (तेलंगणा) यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. ही रक्कम कोठून तरी चोरुन, लुटून किंवा फसवणूक करून आणल्याचा संशय बळावल्याने या सर्वांना टोळी विरोधी पथकाने ताब्यात घेतले.