17 वर्षीय तरुणीवर चाकूहल्ला, हल्लेखोरास नागरिकांनी पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 23:27 IST2019-09-02T23:27:39+5:302019-09-02T23:27:47+5:30
यवतमाळ - शहरातील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलजवळ सोमवारी (2 सप्टेंबर) सायंकाळी धक्कादायक घटना घडली. दोन तरुणांनी एका १७ वर्षीय ...

17 वर्षीय तरुणीवर चाकूहल्ला, हल्लेखोरास नागरिकांनी पकडले
यवतमाळ - शहरातील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलजवळ सोमवारी (2 सप्टेंबर) सायंकाळी धक्कादायक घटना घडली. दोन तरुणांनी एका १७ वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी नंदकिशोर चौधरी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. तर पीडित तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वर्धा येथील मुळची रहिवासी असलेली १७ वर्षीय पीडित तरुणी यवतमाळमधील कनिष्ठ विद्यालयात शिक्षण घेत आहे. सोमवारी सायंकाळच्या वेळी ही युवती एका महिलेसह काही कामानिमित्त बसस्थानक परिसरात आली होती. बसस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलजवळ दोन दुचाकीस्वारांनी या युवतीला घेरलं. दुचाकीस्वार तरुणांनी तरूणीसोबत असलेल्या महिलेला धक्का दिला आणि त्यानंतर तरुणीच्या पोटावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. यावेळी सोबत असलेल्या महिलेने प्रसंगावधान दाखवत आरडाओरड केली. पीडित तरुणी आणि महिलेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. चाकू हल्ला करणाऱ्या तरुणांना पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिला. दरम्यान, एकाने घटनास्थळावरुन पळ काढला तर दुसऱ्या तरुणाला नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केलं. नंदकिशोर चौधरी असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे, तो वर्धा येथील रहिवासी आहे. मात्र, नंदकिेशोरसोबतचा साथीदार अद्याप फरार आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. हा हल्ला करण्यामागचं नेमकं कारण काय? याचा पोलीस शोध घेत आहेत. तर जखमी तरुणीवर सध्या जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.