भूमाफियांविरोधात आणखी १७ तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:39 IST2018-07-25T22:38:34+5:302018-07-25T22:39:43+5:30
भूमाफियांच्या गाजत असलेल्या प्रकरणात आणखी १५ ते १७ नागरिकांनी भूखंड खरेदीत फसवणुकीच्या मौखिक तक्रारी केल्या असून त्यांना संपूर्ण कागदपत्रांसह फिर्याद नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भूमाफियांविरोधात आणखी १७ तक्रारी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भूमाफियांच्या गाजत असलेल्या प्रकरणात आणखी १५ ते १७ नागरिकांनी भूखंड खरेदीत फसवणुकीच्या मौखिक तक्रारी केल्या असून त्यांना संपूर्ण कागदपत्रांसह फिर्याद नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख तथा यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी बुधवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
एसडीपीओ जगताप म्हणाले, भूखंडासंबंधी पोलिसांकडे येत असलेल्या तक्रारी या दिवाणी स्वरूपाच्या आहेत. अशा प्रकरणात पोलिसांना तपासाचा तेवढा अनुभव नसतो. त्यामुळेच आधीच कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच फिर्याद नोंदवून घेतली जात आहे. राकेश यादव व मंगेश पन्हाळकर यांच्या विरोधात २०१६ मध्ये पहिला गुन्हा नोंदविला गेला. परंतु त्यावेळी योग्य दिशेने तपास होऊ शकला नाही. या टोळीविरुद्ध आता सद्यस्थितीत तीन गुन्हे नोंदविले गेले आहे. आणखी मोठ्या प्रमाणात तक्रारी येतच आहे. पोलिसांचा तपास सध्या ‘बनावट दस्त तयार झाले कसे’ या मुद्यावर केंद्रीत आहे. दुसऱ्या टप्प्यात या बनावट दस्तांचा वापर कुठे व कसा झाला याचा तपास केला जात आहे.
दस्त रद्द करण्याची सोय
ज्यांच्या भूखंडाचे बनावट दस्त तयार करून परस्पर व्यवहार झाले त्यांना उपविभागीय दंडाधिकारी अथवा न्यायालयातून बनावट दस्त रद्द करून घेण्याची सोय आहे. त्यासाठी एफआयआरची प्रत जोडून संबंधिताकडे अर्ज करता येणार आहे.
तीन बँका रडारवर
भूखंड घोटाळ्यात येथील दि यवतमाळ अर्बन को.आॅप., बाबाजी दाते महिला सहकारी बँक आणि गोदावरी मल्टीस्टेट या तीन बँका पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती एसडीपीओ पीयूष जगताप यांनी पत्रपरिषदेत दिली. ते म्हणाले, भूखंडावरील या कर्ज प्रकरणात उपरोक्त बँकांमधील यंत्रणा गुंतलेली असण्याचा दाट संशय आहे. त्यांच्या सहभागाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज प्रकरणे मंजूर होणे, वर्षानुवर्षे सातबारा, मिळकत पत्रिकेवर बोझा न चढणे शक्य नसल्याचे जगताप म्हणाले.
अशी आहे एसडीपीओंची १५ कलमी
आपला भूखंड सुरक्षित आहे की नाही व तो भविष्यात सुरक्षित ठेवता यावा यासाठी एसडीपीओ पीयूष जगताप यांनी १५ कलमी टीप्स् नागरिकांसाठी दिल्या आहेत. त्यानुसार सौदेपत्र, इसार चिठ्ठी, नोटरीद्वारे खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नका, भूखंडाला कंपाऊंड घाला, तेथे नामफलक लावा, त्यावर दस्त क्रमांक, मोबाईल क्रमांक लिहा, जमिनीचा अकृषक करून घ्या, चालू तारखेचा सातबारा काढा, आखीव पत्रिका मिळवा, गेल्या ३० वर्षातील फेरफार तपासा, तलाठ्याला प्रत्यक्ष भेटा, हिस्सेदार कोण, वारसदार कोण हे आधी तपासा, मूळ मालक कोण हे तपासल्याशिवाय प्रॉपर्टीचे व्यवहार करू नका, शंभर रुपयापेक्षा अधिक रकमेचा कोणताही व्यवहार नोंदणीकृत करा, बँकेचा बोझा तपासा, अर्जनविसाने लिहिलेला मजकूर आवर्जुन तपासून घ्या कारण अनेक प्रकरणात या मजकुरात मोठी तफावत आढळून आली असल्याची माहिती पीयूष जगताप यांनी पत्रकारांना दिली.
सर्व ठाणेदारांना निर्देश
भूखंड व्यवहारासंबंधी तक्रार आल्यास पोलीस ती ‘दिवाणी प्रकरण’ म्हणून परत पाठवितात. परंतु अशा तक्रारी परत पाठवू नका, फिर्यादीकडून सविस्तर कागदपत्रे व माहिती घ्या, नंतर गुन्हा दाखल करा अथवा प्रकरण एसआयटीकडे पाठवा, असे निर्देश जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना देण्यात आल्याचे एसडीपीओ पीयूष जगताप यांनी पत्रकारांना सांगितले.