लॉकडाऊनमध्ये शिक्षणासाठी १७ लाख विद्यार्थी ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 01:02 PM2020-06-24T13:02:44+5:302020-06-24T13:03:52+5:30

स्वत:चे अध्यापन कौशल्य आणखी पारखून घेण्यासाठी ५ लाखांपेक्षा जास्त शिक्षकही ऑनलाईन आले आहेत.

17 lakh students online for education in lockdown | लॉकडाऊनमध्ये शिक्षणासाठी १७ लाख विद्यार्थी ऑनलाईन

लॉकडाऊनमध्ये शिक्षणासाठी १७ लाख विद्यार्थी ऑनलाईन

Next
ठळक मुद्देदीक्षा अ‍ॅपचा वापर वाढलामहिनाभरात ‘यूजर’ संख्या एक लाखाहून पोहोचली २१ लाखांवर

अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मुलांचे नैसर्गिक कुतूहल भागविण्याची क्षमता शिक्षणात असते. या कुतूहलापोटी कोरोनामुळे शाळा थांबल्यावरही राज्यातील १७ लाख विद्यार्थ्यांनी स्वत:हून आपले शिक्षण सुरू ठेवले आहे. त्यासाठी शासनाच्या दीक्षा अ‍ॅपचा वापर केला जातोय. विशेष म्हणजे, स्वत:चे अध्यापन कौशल्य आणखी पारखून घेण्यासाठी ५ लाखांपेक्षा जास्त शिक्षकही ऑनलाईन आले आहेत.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने गेल्या तीन वर्षांपासून दीक्षा अ‍ॅपचा वापर करण्याबाबत शाळांना वारंवार सूचना दिल्या होत्या. मात्र जून २०१८ ते मे २०२० या कालावधीत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या अ‍ॅपकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. तीन वर्षात कधीही अ‍ॅपच्या ‘यूजर्स’ची संख्या एक लाखावरही पोहोचू शकलेली नव्हती. तीन वर्षात केवळ एकदाच १३ जुलै २०१९ रोजी ही संख्या एक लाखाच्या वर गेली. पण तीही दीड लाखाच्या आतच राहिली.

परंतु, यंदा मार्चअखेरीस अचानक कोरोनामुळे शाळा बंद झाल्या. त्यानंतर जून-जुलैमध्ये पुन्हा शाळा सुरू होण्याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात शिक्षणाची गोडी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दीक्षा अ‍ॅपवर आले. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने गेल्या तीन वर्षातील वापरकर्त्यांची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. त्यानुसार, तीन वर्ष एक लाखाच्या खाली असलेली वापरकर्त्यांची संख्या लॉकडाऊनमध्ये, त्यातही विशेषत: मे-जून या महिनाभरात एक लाखावरून थेट २२ लाखांवर पोहोचली आहे. त्यात १७ लाख विद्यार्थी आणि ५ लाख शिक्षकांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, हे विद्यार्थी यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, सिंधुदुर्ग, रायगड व इतर जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे शिक्षणाची गोडी खरी असेल तर शाळा, शिकवण्या बंद असल्या तरी मुलं आपापल्या पद्धतीने शिक्षणाचे मार्ग शोधतातच, हे स्पष्ट होते.

यवतमाळ, गोंदिया, नागपूरमध्ये वाढ
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने मे ते जूनमधील दीक्षा अ‍ॅपच्या वापराबाबत विविध जिल्ह्यांचा ‘परफॉर्मन्स’ जाहीर केला आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात ६,१९८ विद्यार्थी अ‍ॅपवर शिकत आहेत. गोंदिया जिल्ह्यात ३,५२८ विद्यार्थी, चंद्रपूरमध्ये ९,६७८ विद्यार्थी, अकोला ५,७०१ विद्यार्थी, अमरावती ७,४०१ विद्यार्थी, भंडारा ७,४६९ विद्यार्थी, बुलडाणा ८,५३४ विद्यार्थी, तर नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ४३ हजार ७१४ विद्यार्थी अ‍ॅपचा वापर करीत आहेत.

कोण किती मजकूर वापरतोय?
या अहवालात कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थी दीक्षा अ‍ॅप वापरतात याच्या आकडेवारीप्रमाणेच कोणी किती मजकुराचा अभ्यास केला, याचीही आकडेवारी स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार, नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी १ लाख ६३ हजार ४९६, पुणे जिल्ह्यात ७ लाख ८७ हजार ४९२, मुंबईत ५ लाख ५७ हजार ८२९, लातूरमध्ये १ लाख ५ हजार विद्यार्थ्यांनी दीक्षा अ‍ॅपचा कंटेन्ट अभ्यासला आहे. यात नागपूरसारख्या जिल्ह्याला उत्तम परफॉर्मन्ससाठी स्टार देण्यात आला आहे. तर यवतमाळ, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांना सुधारण्याची सूचना करण्यात आली आहे.

Web Title: 17 lakh students online for education in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.