John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 15:36 IST2025-12-12T15:36:30+5:302025-12-12T15:36:49+5:30
John Cena Last Match: जॉन सीनाच्या या अखेरच्या लढतीबद्दल संपूर्ण WWE जगतात भावनिक वातावरण आहे. ‘सॅटरडे नाईट्स मेन इव्हेंट’मध्ये तो अखेरचा WWE रिंगमध्ये उतरणार आहे.

John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
John Cena Retirement: WWE मधील दिग्गज सुपरस्टार आणि 'चेहरा' म्हणून ओळखला जाणारा जॉन सीना आता आपल्या व्यावसायिक कुस्ती कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यावर आहे. शनिवारी रात्री (भारतात रविवार, सकाळी ६:३० वाजता सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर) होणाऱ्या ‘सॅटरडे नाईट्स मेन इव्हेंट’मध्ये तो अखेरचा WWE रिंगमध्ये उतरणार आहे.
जॉन सीनाच्या या अखेरच्या लढतीबद्दल संपूर्ण WWE जगतात भावनिक वातावरण आहे. समालोचक आणि माजी रेसलर वेड बॅरेट यांनी 'दैनिक जागरण'शी बोलताना हा क्षण WWE इतिहासातील सर्वात भावूक क्षणांपैकी एक असेल, असे मत व्यक्त केले आहे.
वेड बॅरेट यांनी सांगितले की, "सीना निवृत्त होणार हे अपेक्षितच होते, पण हॉलीवूडमधील व्यस्त वेळापत्रकातून १२ महिने रिंगमध्ये उतरून जगभर शहरांमध्ये लढणे, ही त्याची WWE प्रति असलेली वचनबद्धता दर्शवते."
बॅरेट यांच्या मते, जॉन सीना सहसा आपल्या भावना व्यक्त करत नाही, पण हा निरोपाचा क्षण त्याच्यासाठीही संयम राखण्यासाठी कठीण ठरणारा असेल. सीनाच्या या शेवटच्या सामन्यातून एका अध्यायाचा शेवट होऊन एका नव्या युगाची सुरुवात होईल. सीनाचा शेवटचा सामना गुंथर किंवा एलए नाईट यापैकी एकासोबत होणार आहे.
कोडी रोड्स WWE चा नवा चेहरा
जॉन सीनाच्या निवृत्तीनंतर WWE चा पुढचा 'चेहरा' कोण असेल, या प्रश्नावर बॅरेट यांनी कोडी रोड्स याचे नाव घेतले. कोडी रोड्स सध्या कठोर परिश्रम, शिस्त आणि प्रमोशनल वर्कच्या बाबतीत सीनाप्रमाणेच असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, दीर्घकाळासाठी ब्रॉन ब्रेकर, कार्मेलो हेज आणि ट्रिक विलियम्स यांसारख्या युवा सुपरस्टार्सची गरज भासेल, असेही त्यांनी नमूद केले.