जिल्हा परिषद निवडणूक : स्वबळाचा नारा; इच्छूक उमेदवार लागले कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 14:03 IST2019-12-21T14:03:06+5:302019-12-21T14:03:14+5:30
इच्छूकांनी गॉडफादरसह मतदारांच्या गाठीभेटी घेतल्याने ग्रामीण भागात गुलाबी थंडीतही राजकारण चांगलेच तापत आहे.

जिल्हा परिषद निवडणूक : स्वबळाचा नारा; इच्छूक उमेदवार लागले कामाला
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशीही अर्थात २० डिसेंबरपर्यंत कोणत्याही पक्षाची युती किंवा आघाडी झाली नाही. प्रत्येकाने स्वबळाची तयारी करीत मित्रपक्षाकडून युतीचा प्रस्ताव येतो का यावर भर दिल्याने युतीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. दरम्यान, इच्छूकांनी गॉडफादरसह मतदारांच्या गाठीभेटी घेतल्याने ग्रामीण भागात गुलाबी थंडीतही राजकारण चांगलेच तापत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवरील अनिश्चिततेचे ढग दूर केले असून, नियोजित कार्यक्रमानुसार ७ जानेवारी रोजी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यावेळची जिल्हा परिषदेची निवडणुक विविध कारणाने चर्चेत आली आहे. गत २५ वर्षांपासून एकमेकांच्या हातात हात देऊन निवडणुकीला सामोरे जाणारे शिवसेना, भाजपा यावेळी एकमेकांपासून दूर झाले आहेत. दुसरीकडे काँग्रेसची धुरा सांभाळणारे माजी मंत्री अनंतराव देशमुख यावेळी जनविकास आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे निवडणुक रिंगणात आपले उमेदवार उतरवित आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युतीसंदर्भात अद्याप ठोस बैठक झाली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. युतीत शिवसेनेला सोबत घ्यायचे की नाही याबाबत मतभिन्नता असल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे. गतवेळी काँग्रेसला सर्वाधिक १७ जागेवर विजय मिळाला होता. त्याखालोखाल राकाँ व शिवसेना प्रत्येकी आठ जागेवर होते. यावेळची निवडणूक स्वबळावर लढवावी, असा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छूक उमेदवार, पदाधिकऱ्यांमधून उमटत असल्यानेही काँग्रेस, राकाँ व सेनेच्या महायुतीवर प्रश्नचिन्ह लागत असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेकडून काँग्रेसला अद्याप युतीसंदर्भात प्रस्ताव आला नसल्याचीही माहिती आहे. यासंदर्भात २१ डिसेंबर रोजी प्राथमिक टप्प्यात बैठक होऊ शकते, असेही काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. काँग्रेस, राकाँ, भाजपा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, जनविकास आघाडी याबरोबरच यावेळी नव्यानेच संभाजी ब्रिगेडही स्वतंत्रपणे जि.प. व पं.स. निवडणुकीत उतरत असल्याने चुरस निर्माण होण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे.