एकता दिनी युवक धावले; युवतींनी घेतली एकात्मतेची शपथ!
By संतोष वानखडे | Updated: October 31, 2022 16:11 IST2022-10-31T16:10:54+5:302022-10-31T16:11:21+5:30
जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू केंद्र आणि विविध क्रीडा संघटना यांच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल येथून ‘एकता दौड’ घेण्यात आली.

एकता दिनी युवक धावले; युवतींनी घेतली एकात्मतेची शपथ!
वाशिम : देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून जिल्ह्यात साजरी करण्यात आली. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू केंद्र आणि विविध क्रीडा संघटना यांच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल येथून ‘एकता दौड’ घेण्यात आली. यामध्ये युवक धावले असून, समारोपीय कार्यक्रमात युवतींनी एकात्मतेची शपथ घेतली.
जिल्हा क्रीडा संकुल येथे विधान परिषद सदस्य आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांनी एकता दौडला हिरवा झेंडा दाखविली. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेंद्र शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, अरुण सरनाईक, बाकलीवाल विद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे विभाग प्रमुख अमोल काळे, नेहरू युवा केंद्राचे दत्ता मोहळ आणि स्काऊट-गाईडचे सदानंद शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. एकता दौडमध्ये विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, एनसीसीचे विद्यार्थी, पोलीस वाहतूक शाखा, पोलीस यंत्रणा तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.