वाशिममध्ये युवा शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला
By नंदकिशोर नारे | Updated: August 21, 2023 15:04 IST2023-08-21T15:02:07+5:302023-08-21T15:04:34+5:30
रोशन मुंदे हा वडिलांच्या नावे असलेल्या दोन एकर शेतीमध्ये कपाशीच्या पिकात काम करीत होता.

वाशिममध्ये युवा शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला
वाशिम : शेतात काम करीत असलेल्या युवा शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना कारंजा तालुक्यातील वापटी कुपठी येथे सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. रोशन प्रल्हाद मुंदे, असे रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.
माहितीनुसार, रोशन मुंदे हा वडिलांच्या नावे असलेल्या दोन एकर शेतीमध्ये कपाशीच्या पिकात काम करीत होता. अचानक रानडुकराने त्याच्यावर हल्ला करून त्याच्या पायाला गंभीर दुखापत केली. रोशन मुंदे हा अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील एकटाच कमवता असून, डाॅक्टरांनी त्याला दोन महिने विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे कुटुंबाच्या उदरभरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाकडून रोशन मुंदे याला तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असून, वन्यप्राण्यांचा बंदोबस्तही करण्याची मागणी होत आहे.