वाशिम जिल्ह्यातील सिंचन विहिरींची कामे रखडलेली
By Admin | Updated: December 26, 2014 00:39 IST2014-12-26T00:39:14+5:302014-12-26T00:39:14+5:30
सिंचन विहिरींचे उद्दिष्ट अपूर्ण : १८८५ सिंचन विहिरींची कामे प्रलंबित.

वाशिम जिल्ह्यातील सिंचन विहिरींची कामे रखडलेली
वाशिम : विविध योजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या सिंचन विहिरींची कामे रखडलेली असून, या रखडलेल्या कामांमुळे शेतकर्यांसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सिंचन विहिरींचे दिलेले उद्दिष्टही पूर्ण करण्यात आले नसल्याचे जिल्हय़ात चित्र आहे. जवळपास १८८५ सिंचन विहिरींची कामे रखडली असून, ती त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
शासनातर्फे धडक सिंचन विहीर व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येते. जिल्हय़ात २00९ पासून शासनातर्फे धडक सिंचन विहीर योजना सुरू करण्यात आली असून, यासाठी १,३00 विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्दिष्ट मात्र योग्य नियोजनाअभावी पार पडू शकले नाही. रखडलेल्या विहिरींपैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अल्पभूधारक शेतकरी यांच्या विहिरींचा समावेश महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत करण्यात आला, यासाठी शासनाच्यावतीने लाखो रूपयेही दिल्या जात असताना जिल्हय़ातील धडक सिंचन ४१६ व रोहयोचे १२२९ विहिरींचे असे एकूण १८८५ विहिरींची कामे प्रलंबित दिसून येत आहेत.
*जिल्हय़ातील सिंचनातील अनुशेषात वाढ
जिल्हय़ातील सिंचन विहिरींच्या रखडलेल्या कामांमुळे जिल्हय़ातील सिंचनातील अनुशेषात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मंगरूळपीर तालुक्यात रखडलेल्या कामांना प्राधान्य दिल्या जात असले तरी जिल्हय़ातील इतर ५ तालुक्यांमध्ये मात्र अद्यापही सिंचन विहिरींच्या कामांना गती आल्याचे दिसून येत नाही. संबंधित यंत्रणेने रखडलेली कामे त्वरित सुरू करावी व जिल्हय़ातील सिंचनाचा वाढलेला अनुशेष कमी करण्याची मागणी शेतकर्यांतून केल्या जात आहे.