महिला, मुलींनी मानसिक कणखर व्हावे - निलोफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 15:38 IST2019-12-28T15:38:36+5:302019-12-28T15:38:56+5:30
आत्मविश्वासाच्या बळावर वाशिम पोलिस दलातील निलोफर बी. शेख नशीर यांनी अमरावती परिक्षेत्र पोलिस क्रीडा स्पर्धेतील विविध प्रकारात पाच सुवर्ण पदक मिळविले.

महिला, मुलींनी मानसिक कणखर व्हावे - निलोफर
- सुनील काकडे
वाशिम : आई-वडिलांकडून सदोदित मिळालेली प्रेरणा, स्वत:ला समाजासमोर सिद्ध करण्याची जीद्द आणि उत्तूंग आत्मविश्वासाच्या बळावर वाशिम पोलिस दलातील निलोफर बी. शेख नशीर यांनी अमरावती परिक्षेत्र पोलिस क्रीडा स्पर्धेतील विविध प्रकारात पाच सुवर्ण पदक मिळविले. या यशामागील रहस्य, निर्भेळ यशासाठी नवोदित खेळाडूंनी नेमके काय करायला हवे, समाजातील मुली व महिलांना कशाप्रकारे आत्मनिर्भर होता येईल, यासह तत्सम विषयांवर निलोफर त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
तुमच्या क्रीडा करियरविषयी काय सांगाल?
आयपीएस अधिकारी किरण बेदी ह्या माझ्या आदर्श आहेत. त्यांच्या ‘डॅशींग’ वृत्तीचे किस्से ऐकून मी पोलिस होण्याचे ध्येय बाळगले. त्यानुसार, शिक्षण घेत असताना कबड्डी, कुस्ती, गोळाफेक, रस्सीखेच या मैदानी खेळांमध्ये मी सहभागी होत गेले. २०११ मधील पोलिस भरतीत केवळ एका गुणाने मी अयशस्वी ठरले. त्यानंतर लग्न झाले; पण पोलिस व्हायचेच, अशी खूणगाठ मनाशी बांधली. २०१४ मध्ये माझी मुलगी केवळ ७ महिन्याची असतानाही पोलिस भरतीत सहभागी होऊन मी यशस्वी झाले. वेटलिप्टींग, कुस्ती, गोळाफेक, बॉक्सींग हे मैदानी खेळही खेळणे सुरूच ठेवले.
नवोदित खेळाडूंनी यशस्वी होण्यासाठी नेमके काय करायला हवे ?
कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सरावातील सातत्य, मेहनत आणि जीद्द या बाबी फार महत्वाच्या ठरतात. नवोदित खेळाडूंनी हे लक्षात घेऊन अपयशानंतर खचून न जाता जोपर्यंत आपण बाळगलेले उद्दीष्ट साध्य होत नाही, आपण यशस्वी होत नाही, तोपर्यंत प्रयत्न चालूच ठेवायला हवे. विशेषत: युवतींनी पोलिस दलात दाखल होण्याच्या दृष्टीने मैदानी खेळांमध्ये रुची घ्यायला हवी. यामुळे आपसूकच त्या शारिरीकदृष्ट्या सुदृढ होण्यासोबतच आत्मनिर्भर देखील होतील.
महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना अपेक्षित आहेत?
महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. वाशिम जिल्ह्यातही त्याची अंमलबजावणी सुरू आहे. महिला व मुलींनी देखील स्वत:ला सर्वच बाबतीत सक्षम करण्यासाठी स्वत:त बदल घडविणे अपेक्षित आहे. मानसिक, शारिरीक अत्याचार होत असेल तर त्याचा सुरूवातीलाच कठोर विरोध व्हायला हवा. पथनाट्यातून जनजागृती होणे गरजेचे आहे.