‘त्या’ भरवितात भुकेल्या माकडांना हाताने अन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 14:57 IST2019-06-24T14:57:29+5:302019-06-24T14:57:52+5:30
रिसोड (वाशिम): अन्नपाण्यासाठी लोकवस्तीत भटकणाºया माकडांना भर जहॉगिर येथील सिंधू महादेव कोरकने या गेल्या तीन वर्षांपासून हाताने अन्न भरवून भूतदयेचा परिचय देत आहेत.

‘त्या’ भरवितात भुकेल्या माकडांना हाताने अन्न
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम): अन्नपाण्यासाठी लोकवस्तीत भटकणाºया माकडांना भर जहॉगिर येथील सिंधू महादेव कोरकने या गेल्या तीन वर्षांपासून हाताने अन्न भरवून भूतदयेचा परिचय देत आहेत. सिंधू कोरकने यांच्या भूतदयेमुळे अनेक माकडे त्यांच्या घरात खेळतात आणि त्यांच्या हाताने फळे, बिस्किटांसह शेंगदाणे आणि इतर पदार्थ खात असल्याचे चित्र दर शनिवारी पाहायला मिळते.
भर जहॉगिर सह परिसरातील लोकवस्तीत शेकडो माकडे अन्नपाण्यासाठी फिरत आहेत. लोकांनी फेकलेले शिळे अन्न, झाडांचा पाला, खाऊन ही माकडे आपले पोट भरीत असतात. या माकडांचे पोट भरण्यासाठी भर जहॉगिर येथील सिंधू महादेव कोरकने या दर शनिवारी एक किलो शेंगदाणे आणि एक किलो गुळ विकत घेतात आणि स्वत:च्या हाताने त्या माकडांना गुळ, शेंगदाणे चारतात. त्याशिवाय बिस्किटे आणि फळेही ते माकडांसाठी ठेवतात. सिंधू कोरकने यांचे पती महादेव कोकरने हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी आपल्या पत्नीला हा उपक्रम राबविण्यासाठी यथोचित सहकार्य करून भूतदयेला हातभार दिला आहे. सिंधू कोरकने न चुकता शनिवारी माकडांसाठी खाद्यान्न ठेवत असल्याने माकडांनाही सवय लागली असून, ते नेमाने शनिवारी कोरकने यांच्या घरी दाखल होतात. जवळपास आठ ते दहा माकडांचा कळप या ठिकाणी शांतपणे सिंधू कोरकने यांच्या हातून शेंगदाणे खात असल्याचे दिसते. सिंधू कोरकने आणि त्यांचे पतीसुद्धा शांतपणे दारात बसून माकडांना शेंगदाणे भरवितात. त्यांच्या या उपक्रमामुळे माकडांना मात्र चांगला आधार झाला आहे. कोरकने दाम्पत्याचा हा भूतदयेचा उपक्रम इतरांनाही प्रेरणा देणारा ठरत आहे.