जंगलात वणवा, २ तास आग, ६ एकरातील वनसंपदा नष्ट
By नंदकिशोर नारे | Updated: March 26, 2024 15:52 IST2024-03-26T15:51:40+5:302024-03-26T15:52:40+5:30
वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा येथील प्रादेशिक वनविभागाच्या अख्यत्यारीतील जंगलात सोमवार २५ मार्चला दुपारी वणवा भडकला. याबाबत ...

जंगलात वणवा, २ तास आग, ६ एकरातील वनसंपदा नष्ट
वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा येथील प्रादेशिक वनविभागाच्या अख्यत्यारीतील जंगलात सोमवार २५ मार्चला दुपारी वणवा भडकला. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व वन्यजीव प्रेमींनी तातडीने धाव घेत सुमारे दोन तास अथक परिश्रम करून या भयानक वनव्यावर नियंत्रण मिळविले. या वनव्यात असंख्य लहान-लहान जिवजंतु भस्मसात झाले असून वनसंपदेचेही काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी वनविभाग आणि वन्यजीवप्रेमींनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे अनमोल अशी जैवविविधता वाचली आहे.
वनोजा येथील प्रादेशिक जंगलात दुपारी बारा वाजता वणवा पेटल्याची माहिती वनविभाग व वनोजा येथील वन्यजीव प्रेमींना मिळाली. त्यानंतर कारंजा-मंगरुळपीरचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे व त्यांचे सहकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि झाडाच्या फांद्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे आगीवर नियंत्रणासाठी फायर ब्लोअरची मदत घेण्यात आली, पण जोराचा वारा वाहत असल्यामुळे वणव्यावर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येत होत्या. तथापि, त्यांनी अथक परिश्रम घेत तब्बल दोन ते अडीच तासांत या वणव्यावर नियंत्रण मिळविले. जंगलात नेमकी कशामुळे आग लागली, याचे कारण कळू शकले नाही. या वणव्यात अंदाजे ५-६ एकरावरील वनसंपदा नष्ट झाली. तरी वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.