पत्नीचा खून करणार्या पतीस जन्मठेप
By Admin | Updated: August 8, 2014 00:20 IST2014-08-07T23:49:52+5:302014-08-08T00:20:24+5:30
खामगाव न्यायालयाचा निकाल : चारित्र्याच्या संशयावरुन घडली घटना

पत्नीचा खून करणार्या पतीस जन्मठेप
खामगाव : डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीचा खून केल्याप्रकरणी आज गुरूवार ७ ऑगस्ट रोजी खामगाव न्यायालयाने आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याबाबत सविस्तर असे की, जळगाव जामोद तालुक्यातील तिवडी येथील डॉ.श्रीकृष्ण गुलाबराव घाईट (वय ४५ घटनावेळी) याचा खामगाव तालुक्यातील वाकुड येथील मंगला हिचेशी पुनर्विवाह झाला होता. त्यानंतर त्याला प्रफुल्ल (वय १0) नावाचा मुलगा झाला. पती श्रीकृष्ण हा नेहमी मंगलाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे घाईट दाम्पत्यांमध्ये नेहमी वाद होत असत. या वादामुळे मंगला काही दिवस माहेरी होती. परंतु श्रीकृष्णचा मोठा भाऊ नवृत्ती घाईट यांच्या तेरवीसाठी मंगला तिवडी येथे आली. २८ जुलै २0१२ ला तेरवीचा कार्यक्रम आटोपून ती झोपी गेली असता २९ जुलैच्या पहाटे ३.३0 वाजता श्रीकृष्ण याने मंगला हिच्यावर कुर्हाडीने अनेक वार केले. यावेळी आई आरडाओरड करीत असल्याने तिचा मुलगा प्रफुल्ल झोपेतून जागा झाला. वडिल आईचा जीव घेत असल्याच्या घटनेने भेदरलेल्या प्रफुल्लने जीव मुठीत धरून आईशी संवाद साधला. त्यावेळी मंगला हिने प्रफुल्ल यास तू तुझ्या चुलत भाऊ पुरुषोत्तम घाईट व मामा राजू खरात यांना तुझे वडिल मला मारत असल्याचे सांगण्यास सांगितले. चुलत भाऊ आणि मामाला सांगून परत येईपर्यंत मंगलाचा मृत्यू झाला होता. याबाबतची तक्रार पुरुषोत्तम नवृत्ती घाईट याने जळगाव जामोद पोलिसात दिल्यानंतर आरोपी डॉ. श्रीकृष्ण घाईट विरुध्द ३0२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी आज ७ ऑगस्ट रोजी खामगाव येथील न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने ७ साक्षीदार तपासण्यात आले. यात मृतकाचा मुलगा प्रफुल्ल, पुरुषोत्तम घाईट, पोलिस पाटील विनायक घाईट, डॉ.बानाईत, मृतकाचा भाऊ राजू खरात यांची साक्ष घेण्यात आली. यामध्ये मृतकाचा मुलगा प्रफुल्ल याची साक्ष महत्वाची ठरली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एम. अग्रवाल यांनी आरोपी डॉ.श्रीकृष्ण गुलाबराव घाईट यास जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंड ठोठावला. सरकारी पक्षाच्यावतीने अँड. व्ही. वाय. खिरोडकर यांनी युक्तीवाद केला.