पावसाळ्यात कुठे जाळणार कोरोनाबाधितांचे मृतदेह?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:30 IST2021-05-29T04:30:11+5:302021-05-29T04:30:11+5:30
वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसागणिक तीव्र होत चालले आहे. संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच ...

पावसाळ्यात कुठे जाळणार कोरोनाबाधितांचे मृतदेह?
वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसागणिक तीव्र होत चालले आहे. संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच मृत्यूचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाचे संकट उद्भवून १३ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही अद्यापपर्यंत स्मशानभूमीत स्वतंत्र शेड उभारण्यात आले नसल्याने उघड्यावरच चिताग्नी द्यावा लागतो. तोंडावर असलेल्या पावसाळ्यात मात्र मृतदेह कसे आणि कुठे जाळणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोना संसर्गाने बाधित पहिला रुग्ण आढळला होता. संसर्गाच्या पहिल्या लाटेत (१५ फेब्रुवारी २०२१ पूर्वी) ७ हजार ३३९ कोरोनाबाधित रुग्ण निष्पन्न झाले होते; तर मृत्यूचा आकडाही जेमतेम १५६ होता. त्यानंतर मात्र आलेल्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येसोबतच कोरोनाने मृत्यू होण्याच्या प्रमाणातही वेगाने वाढ झाली आहे. २० मे अखेर कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३९ हजार ४७८ वर पोहोचला असून, मृत्यूच्या आकड्यानेही ४५० चा आकडा ओलांडला आहे.
दरम्यान, कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्यास मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द न करता व्यवस्थितरित्या पॅक करून नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचारी त्यास स्थानिक स्मशानभूमीत चिताग्नी देतात. वाशिमच्या मोक्षधाम स्मशानभूमीत मात्र अद्यापपर्यंत शववाहिनी व शेडची सुविधा उभी केली नसल्याने उघड्यावरच मृतदेह जाळण्यात येत आहेत. या प्रक्रियेत आतापर्यंत तरी अडचण उद्भवली नाही; मात्र तोंडावर असलेल्या पावसाळ्यात कोरोना बाधितांचे मृतदेह कुठे व कसे जाळणार, हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.
.....................
बाॅक्स :
रिसोडमध्ये शेडचे काम अर्धवट
रिसोड येथे कोरोनाबाधितांचे मृतदेह जाळण्याकरिता स्वतंत्र शेड उभारण्यात येत आहे; मात्र त्याचे काम रखडले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेड उभारणीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
....................
३९,४७८
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित
४५०
कोरोनाने झालेले मृत्यू
....................
कोट :
वाशिमच्या मोक्षधाम स्मशानभूमीमध्ये कोरोनाबाधितांच्या मृतदेहांना चिताग्नी दिला जातो. त्याठिकाणी स्वतंत्र शेड व शववाहिनी उभारण्याची बाब प्रस्तावित असून, १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून हे काम केले जाणार आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूददेखील करण्यात आली आहे. साधारणत: एक ते दीड महिन्यात शेड उभे होईल.
- दीपक मोरे,
मुख्याधिकारी, न. प., वाशिम