जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राष्ट्रगीत विसरतात तेव्हा..
By Admin | Updated: August 15, 2014 01:51 IST2014-08-14T23:24:15+5:302014-08-15T01:51:25+5:30
वाशिम येथे घडलेला प्रकार, राष्ट्रगिताची समाप्ती अध्र्यावरच.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राष्ट्रगीत विसरतात तेव्हा..
वाशिम : स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस अगोदर वाशिम येथे जिल्हा सैनिक कार्यालयाने आयोजित केलेल्या माँ तुझे सलाम या कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. जनसामान्यांमध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये दस्तुरखुद्द जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीच राष्ट्रगीत विसरले. शेकडो वाशिमवासियांच्या साक्षीने या कार्यक्रमात एवढा गोंधळ उडाला की, राष्ट्रगीत अध्र्यावरच सोडावे लागले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय व शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने नगरपालिका ते जिल्हा क्रीडा संकुल मैदानापर्यंत ह्यमाँ तुझे सलामह्ण या ऋणानुबंध व जनजागरण रॅली गुरुवारी काढण्यात आली. नगरपरिषदेच्या प्रांगणात सकाळी ९ वाजता झालेल्या रॅलीच्या उद्घाटन सोहळा झाला. कार्यक्रमात प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी एस.बी. राऊत यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर स्काऊट गाईडच्या बँड पथकाने राष्ट्रगितास सुरूवात केली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल आर.आर. जाधव यांनी ध्वनीक्षेपक हातात घेऊन बँड पथकाच्या तालावर राष्ट्रगीत म्हणण्यास सुरूवात केली; मात्र ते राष्ट्रगिताची केवळ सुरूवातच करू शकले. जन गण मन.. या तीन शब्दांच्या पुढे त्यांची गाडीच सरकत नव्हती. जाधव पुढे सरकत नसल्याने राष्ट्रगितास साथ देणार्या बँड पथकाचीही पंचाईत झाली. या प्रकारामुळे गोंधळलेल्या जाधव यांनी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. ध्वनीक्षेपक व्यवस्थित पकडून, त्यांनी पुन्हा राष्ट्रगित सुरू केले; परंतु यावेळीही त्यांची गाडी काही केल्या ह्यजन गण मनह्ण यापुढे सरकण्यास तयार नव्हती. जाधव यांच्या या विस्मरणाने बँड पथक गोंधळले. सैनिक कार्यालयातील कर्मचारी एस. व्ही. देशपांडे यांनी लगेच माईक हातात घेऊन झालेला गोंधळ सावरण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनाही राष्ट्रगीत म्हणता आले नाही. राष्ट्रगीत म्हणताना तेही अडकल्याने गोंधळ आणखी वाढला. अखेर देशपांडे यांनाही राष्ट्रगीत येत नसल्याचे पाहून, राष्ट्रगिताची समाप्ती अध्र्यावरच करावी लागली. कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी आणि मान्यवर नागरिक या प्रकारामुळे अक्षरश: आवाक् झाले.
*या प्रकारासंदर्भात घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे असा प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने दक्ष राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत भारती आणि नगरपरिषद मुख्याधिकारी वसंत इंगोले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याप्रकरणी प्रतिक्रीया व्यक्त करण्यास नकार दिला.
*अनपेक्षितपणे घडलेल्या चुकीबद्दल खेद
ह्यमाँ तुझे सलामह्ण या ऋणानुबंध जनजागरण रॅलीच्या प्रसंगी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत म्हणताना माझ्याकडून अनपेक्षितपणे चूक घडली. देशसेवेचे व्रत मी स्विकारले आहे, त्यामुळे राष्ट्रगिताचा अवमान होणे, हे मला कदापि मान्य नाही. मात्र ऐनवेळी घडलेल्या या चुकीबद्दल मला अंत्यत खेद असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.आर. जाधव यांनी दिलगीर व्यक्त केली.