राज्यात यंदा गव्हाचे १५ टक्के क्षेत्र वाढणार; पोषक वातावरण आणि सिंचनासाठी मुबलक पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 08:11 IST2024-12-02T08:08:22+5:302024-12-02T08:11:32+5:30
यंदा पोषक वातावरण आणि सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने गव्हाच्या क्षेत्रात यंदा वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

राज्यात यंदा गव्हाचे १५ टक्के क्षेत्र वाढणार; पोषक वातावरण आणि सिंचनासाठी मुबलक पाणीसाठा
वाशिम : सध्या राज्यात चांगलीच थंडी वाढल्याने किमान तापमानाचा पारा काही प्रमाणात घटलेला आहे. यामुळे गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग आला आहे. यंदा पोषक वातावरण आणि सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने गव्हाच्या क्षेत्रात यंदा वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
राज्यात रब्बी मधील गव्हाचे सरासरी क्षेत्र १० लाख ८५ हजार ०१२ हेक्टर आहे. त्यात २०२२ मध्ये राज्यात १० लाख ५९ हजार ९७३ हेक्टरवर पेरणी झाली होती, तर गतवर्षी राज्यात १२ लाख ८ हजार ८५० हेक्टरवर पेरणी झाली होती. अर्थात गतवर्षी सरासरीपेक्षा गव्हाचे क्षेत्र पंधरा टक्के क्षेत्र वाढले होते. यंदाही जास्त झालेल्या पावसामुळे गव्हाच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. , दिवाळीनंतर काही भागात ढगाळ वातावरण तयार झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या करण्यास सुरुवात केली.
११ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज
मुंबई/नागपूर: दक्षिण भारतावर धडकलेल्या चक्रीवादळाचा विपरीत परिणाम म्हणून दोन ते पाच डिसेंबरपर्यंत राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला. चक्रीवादळामुळे राज्याच्या दक्षिण भागात हवामान ढगाळ नोंदवण्यात आले. त्यामुळे थंडी कमी झाली असून आठवडाभरासाठी थंडी ‘विश्रांती’ घेणार असल्याचे चित्र आहे.
सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. विदर्भातही ५ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण व काही जिल्ह्यात किरकोळ पावसाचीही शक्यता आहे. नागपुरात २४ तासात रात्रीचा पारा ४.९ अंशाने वाढला.
बदलत्या वातावरणाचा फटका बसण्याचा धोका
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. विशेषत: हरभरा, तूरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढू शकताे. वाटाणा व तुरीचा बहार गळण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.