अनाथ, निराधारांनी काय खायचे? कोरोनामुळे दातृत्वाचा झरा आटतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:40 IST2021-04-06T04:40:48+5:302021-04-06T04:40:48+5:30
जिल्ह्यातील वाशिम शहरात जुने आययूडीपी काॅलनीत अंध मुलांची निवासी शाळा आहे. त्यात गतवर्षीपर्यंत ५६ मुले शिकायला व वास्तव्याला होती. ...

अनाथ, निराधारांनी काय खायचे? कोरोनामुळे दातृत्वाचा झरा आटतोय
जिल्ह्यातील वाशिम शहरात जुने आययूडीपी काॅलनीत अंध मुलांची निवासी शाळा आहे. त्यात गतवर्षीपर्यंत ५६ मुले शिकायला व वास्तव्याला होती. १६ मार्च २०२० पासून लाॅकडाऊन जाहीर झाला आणि त्यानंतर संबंधित मुलांनाही त्यांच्या पालकांकडे रवाना करून शाळेला कुलूप लावण्यात आले. तेव्हापासून आजतागायत अंध, दिव्यांग मुले परतली नसून, त्यांचे अक्षरश: हाल होत आहेत. केकतउमरा (ता. वाशिम) येथे पांडुरंग उचितकर या समाजसेवकाचा मुलगा दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. असे असताना ध्येयवेड्या पांडुरंगने आणखी १४ अंध मुले दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण करणे सुरू केले. समाजातील काही दानदाते स्वत:हून मदत करीत असत. याशिवाय संगीतात पारंगत असलेली ही अंध मुले विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन चरितार्थ चालवत होती. कोरोनामुळे मात्र गत वर्षभरापासून या सर्व मुलांची दैना होत आहे. जिल्ह्यातील अनाथाश्रम, वृद्धाश्रम, भटक्या मुलांच्या निवासी शाळाही बंद असल्याने अनाथ, निराधारांनी नेमके खायचे काय, असा बिकट प्रश्न उभा ठाकला आहे.
......................
अनुदानावरील संस्थांचे दुर्लक्ष
जिल्ह्यात अनाथ, निराधार, अंध, दिव्यांग व्यक्ती व मुलांचे पालनपोषण करणाऱ्या विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित संस्था गत वर्षभरापासून अडचणीत सापडल्या आहेत; मात्र अनुदान मिळत असलेल्या संस्थांनीही अडचण भासवून अनाथ, निराधारांचे पालनपोषण करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
................
भिकाऱ्यांवरही उपासमार
पुर्वी बसस्थानक, रेल्वे स्थानक, बाजारपेठ, मंदिरानजीक बसून भीक मागणाऱ्या, या माध्यमातून उदरनिर्वाह करणाऱ्या भिकाऱ्यांना अनेकांनी भीक देणे बंद केले. यामुळे त्यांच्यावरही उपासमारीची वेळ ओढवली आहे.
.............
अंध मुले भेटणार जिल्हाधिकाऱ्यांना
केकतउमरा येथील चेतन ऑर्केस्ट्रा ग्रुपची चाैदाही अंध मुले लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न त्यांना करणार आहेत. भीक नको; पण किमान सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या, त्यावर उदरनिर्वाह करू, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली जाणार आहे.
..................
प्रशासनाचा कानाडोळा
कोरोनामुळे विविध घटकांवर परिणाम झाला आहे. विशेषत: निराधार, निराश्रित, अंध, दिव्यांग व्यक्तींना कोणीच वाली उरला नाही. असे असताना त्यांच्या समस्यांकडे प्रशासनही कानाडोळा करीत आहे.
..............
काय म्हणतात सामाजिक कार्यकर्ते
कोरोनाच्या संकटामुळे गत वर्षभरापासून सर्वच प्रकारचे कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे कलावंत असलेल्या अंध मुलांचे पालनपोषण करताना मोठी अडचण निर्माण झाली आहे. माझ्याकडे कुठलीही मालमत्ता नाही. अशा स्थितीत दत्तक घेतलेल्या १४ मुलांचे पालनपोषण कसे करणार?
- पांडुरंग उचितकर, सामाजिक कार्यकर्ते
...................
मी गेल्या अनेक वर्षांपासून कायम विनाअनुदानित तत्त्वावर अंध मुलांसाठी निवासी शाळा चालवत आहे. त्यात गतवर्षीपर्यंत ५६ मुले होती. त्यांच्या पालनपोषणात कुठलीच उणीव ठेवली नाही; मात्र १६ मार्चपासून शाळा बंद आहे. मुलांना त्यांच्या पालकांकडे पाठवून दिले आहे. त्या मुलांचे आता हाल सुरू आहेत.
- लोकचंद राठोड, सामाजिक कार्यकर्ते