पिडित महिला, बालकांच्या तक्रारीसाठी तयार केली ‘वेबसाईट’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 21:08 IST2020-05-18T21:08:03+5:302020-05-18T21:08:51+5:30
पिडित महिला, बालकांच्या तक्रारीसाठी तयार केली ‘वेबसाईट’!

पिडित महिला, बालकांच्या तक्रारीसाठी तयार केली ‘वेबसाईट’!
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर राज्यभरात गेल्या ५३ दिवसांपासून ‘लॉकडाऊन’ लागलेला आहे. यामुळे संपूर्ण कुटूंब दीर्घकाळ एकत्र आल्याने कौटुंबिक कलह निर्माण होण्याची शक्यता आहे; मात्र अन्याय होऊनही पिडित महिला व बालके तक्रार करायला कार्यालयात येऊ शकत नसल्याने त्यांची सोय व्हावी, या उद्देशाने येथील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष संतराम राठोड यांनी स्वखर्चाने ‘वेबसाईट’ तयार केली. राज्यातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे. कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येतही दिवसागणिक वाढच होत आहे. त्यामुळेच ३ मे पर्यंत असलेल्या ‘लॉकडाऊन’ची मुदत १७ मे आणि आता ३१ पर्यंत वाढविण्यात आली. यामुळे अनेकांचे संपूर्ण कुटूंब दीर्घकाळ घरातच एकत्र राहत आहे. अशास्थितीत पुर्वीपासून असलेला कौटुंबिक कलह वृद्धींगत होण्याची शक्यता असून पती-पत्नीमधील वाद, विधवा महिलांना कुटूंबातील अन्य सदस्यांकडून होणारा त्रास, विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ आदी स्वरूपातील घटना बळावण्याचा धोका आहे. यामुळे महिला आणि बालकांना पिडा सहन करावी लागू शकते. असे असताना कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने पिडीत महिला व बालके कायद्याचा आधार किंवा समुपदेशनाची सेवा घेण्यास तालुका, जिल्हा कार्यालयात येण्यासाठी घराबाहेर पडण्यास असमर्थ ठरताहेत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी तक्रार करण्यासाठी ‘वेबसाईट’ तयार केली. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ आणि मतदार जागृतीसाठी मानवी लोगो साकारून ‘गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये जिल्ह्याचे नाव झळकविल्यानंतर पिडित महिला व बालकांसाठी ‘वेबसाईट’ तयार केल्याप्रती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनीही राठोड यांचे कौतुक केले.
अशी आहे ‘वेबसाईट’!
अन्याय, अत्याचार होऊनही घराबाहेर पडून तक्रार करता येत नसल्यास संबंधित पिडित महिला व बालकांना ‘डब्ल्यूसीडी वाशिम डॉट निलेश टॉक डॉट कॉम’ या वेबसाईटवर तक्रार नोंदविता येईल. तक्रारीचा अर्ज आॅनलाईन पद्धतीने अपलोड झाल्यानंतर कुठल्याही क्षणी तक्रार निकाली निघाली किंवा नाही, हे कळू शकेल, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी दिली.