टंचाईच्या काळात आडोळ प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 20:48 IST2017-11-26T20:42:58+5:302017-11-26T20:48:45+5:30
आडोळ लघु प्रकल्पामध्ये अत्यल्प जलसाठा असल्याने पिकांच्या सिंचनासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. दुसरीकडे परिसरात पाणीटंचाई देखील जाणवत आहे. असे असताना पार्डीतिखे गावानजिक धरणातून गेलेली पाईपलाईन लिकेज झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.

टंचाईच्या काळात आडोळ प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय!
लोकमत न्यूज नेटवर्क
बोराळा (वाशिम): येथील आडोळ लघु प्रकल्पामध्ये अत्यल्प जलसाठा असल्याने पिकांच्या सिंचनासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. दुसरीकडे परिसरात पाणीटंचाई देखील जाणवत आहे. असे असताना पार्डीतिखे गावानजिक धरणातून गेलेली पाईपलाईन लिकेज झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाने कानाडोळा केल्याने शेतक-यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
यावर्षी उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे आडोळ लघुप्रकल्पात शिल्लक असलेले संपूर्ण पाणी पिण्याकरिता राखून ठेवण्यात आले असून प्रकल्पासाठी जमिनी देणा-या शेतक-यांना पिकांसाठी पाणी देणे बंद करण्यात आले आहे. शेतक-यांनी जिल्हाधिका-यांमार्फत प्रकल्पातील पाणी मिळण्यासाठी बरेच प्रयत्न केले; परंतु रिसोड, शिरपूर, रिठद या गावांकरिता पाणी राखीव ठेवावे लागत असल्याने सिंचनासाठी यंदा पाणी मिळणार नाही, अशी भुमिका प्रशासनाने घेतली आहे. दुसरीकडे पार्डीतिखे गावाजवळ आडोळ प्रकल्पातून गेलेली पाईपलाईन लिकेज झाल्याने गेल्या १५ दिवसांपासून पाण्याचा राजरोसपणे अपव्यय होत आहे. याशिवाय इतरही ८ ते १० ठिकाणी पाईपलाईन लिकेज असल्याने कोट्यवधी लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे विशेषत: शेतक-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभागाच्या अधिका-यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून पाण्याचा होणारा अपव्यय टाळावा, अशी मागणी जोर धरत आहे. .
पाईपलाईन लिकेज असल्याने होत असलेल्या पाण्याच्या अपव्ययाबद्दल रिसोड नगर परिषदेच्या अभियंत्यांना अनेकवेळा कळविण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून याप्रकरणी उडवाउडवीची उत्तरे मिळतात. त्यामुळे हा प्रश्न ‘जैसे थे’ रखडला आहे.
- बबनराव मिटकरी, शेतकरी, बोराळा जहाँ.