वाशिम जिल्हा परिषद निवडणूकीच्या आरक्षण सोडतीकडे जिल्ह्याचे लक्ष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 14:28 IST2019-04-29T14:27:16+5:302019-04-29T14:28:18+5:30
वाशिम : जिल्हा परिषदेच्या महिला आरक्षणाच्या संख्येत बदल झाल्यामुळे निवडणूक विभागाच्या आदेशानुसार सर्व प्रवर्गातील महिलांसाठी राखीव जागांकरिता येत्या मंगळवार, ३० एप्रिल रोजी वाशिम येथील नियोजन भवन येथे आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

वाशिम जिल्हा परिषद निवडणूकीच्या आरक्षण सोडतीकडे जिल्ह्याचे लक्ष!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेच्या महिला आरक्षणाच्या संख्येत बदल झाल्यामुळे निवडणूक विभागाच्या आदेशानुसार सर्व प्रवर्गातील महिलांसाठी राखीव जागांकरिता येत्या मंगळवार, ३० एप्रिल रोजी वाशिम येथील नियोजन भवन येथे आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह) आरक्षणाची सोडत २७ आॅगस्ट २०१८ रोजी काढण्यात आली होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने २९ आॅगस्ट २०१८ रोजी स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर ३० मार्च २०१९ रोजीच्या पत्रानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, महिला आरक्षणाच्या संख्येत बदल झाला आहे.
अनुसूचित जाती, जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी काढण्यात आलेले आरक्षण कायम ठेवून वाशिम जिल्हा परिषदेच्या केवळ अनुसूचित जाती, जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या सर्व प्रवर्गातील महिलांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी ३० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
याशिवाय जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांकरिता यापूर्वी २७ आॅगस्ट २०१८ रोजी सोडतीद्वारे काढण्यात आलेल्या आरक्षणात बदल नसल्यामुळे या आरक्षण सोडतीची माहिती ३० एप्रिल २०१९ रोजी त्या-त्या तालुक्याच्या तहसील कार्यालयांमध्ये माहितीकरिता उपलब्ध केली जाणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीची व प्रारूप प्रभाग रचनेची माहिती २ मे २०१९ रोजी अधिसूचनेव्दारे प्रसिद्ध केली जाणार आहे. या सर्व घडामोडींकडे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसोबतच राजकीय क्षेत्रात वावरणाºयांचे लक्ष लागले आहे.