वाशिम : मानोरा येथे न्यायालय परिसरात इसमाने घेतले विष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 20:24 IST2018-01-23T20:21:39+5:302018-01-23T20:24:47+5:30
मानोरा (वाशिम): न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाचा निपटारा होण्यास विलंब लागत असल्याने त्यास कंटाळून तालुक्यातील पाळोदी येथील रंजन परशराम चव्हाण (वय ६१ वर्षे) या इसमाने न्यायालयाच्या आवारातच विष प्राशन केल्याची घटना २३ जानेवारीला दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.

वाशिम : मानोरा येथे न्यायालय परिसरात इसमाने घेतले विष!
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम): न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाचा निपटारा होण्यास विलंब लागत असल्याने त्यास कंटाळून तालुक्यातील पाळोदी येथील रंजन परशराम चव्हाण (वय ६१ वर्षे) या इसमाने न्यायालयाच्या आवारातच विष प्राशन केल्याची घटना २३ जानेवारीला दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, न्यायालयात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रकरणाचा निपटारा व्हावा, यासाठी प्रत्येक तारखेला न चुकता हजर राहूनही प्रकरण निकाली निघण्यास विलंब लागत आहे. दरम्यान, या प्रक्रियेस कंटाळलेल्या रंजन चव्हाण यांनी २३ जानेवारीला न्यायालयीन परिसरातील एका हॉलमध्ये विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच चव्हाण यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेप्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता त्यांना यवतमाळच्या रुग्णालयात हलविण्यात आले.
काय आहे प्रकरण?
पाळोदी (ता.मानोरा) येथील एका विद्यालयात कार्यरत रंजन चव्हाण यांच्या मुलाला नोकरीतून कमी करण्यात आले. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, परंतु त्याचा निपटारा वेळेत होत नसल्यामुळे रंजन चव्हाण यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, रंजन चव्हाण यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, वृत्त लिहिस्तोवर पोलिस सुत्रांकडून यासंदर्भात कुठलीही ठोस माहिती मिळू शकली नाही.