वाशिम: जिल्ह्यात पुन्हा गारपीट अन् अवकाळीचा तडाखा, शेतपिकांचं मोठं नुकसान
By संतोष वानखडे | Updated: April 25, 2023 17:51 IST2023-04-25T17:50:29+5:302023-04-25T17:51:05+5:30
अनेक ठिकाणी घरांची पडझड होण्यासह मोठमोठे वृक्ष कोसळण्याच्या घटनाही घडल्या.

वाशिम: जिल्ह्यात पुन्हा गारपीट अन् अवकाळीचा तडाखा, शेतपिकांचं मोठं नुकसान
संतोष वानखडे
वाशिम: जिल्ह्यात मंगळवार २५ एप्रिल रोजी अनेक भागांत वादळीवारा आणि जोरदार अवकाळी पावसासह गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीत शेतीपिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्याला फटका बसला आहेच; शिवाय अनेक ठिकाणी घरांची पडझड होण्यासह मोठमोठे वृक्ष कोसळण्याच्या घटनाही घडल्या.
मागील काही दिवसांपासून निसर्ग जणू कोपल्याचेच दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात वारंवार वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानातून शेतकरी सावरला नसतानाच मंगळवारी (दि. २५ ) पुन्हा जिल्ह्यातील अनेक भागांत वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला.
यात शेतीपिके नेस्तनाबूत झाली, तर घरांची पडझड हाेण्यासह वृक्षही कोसळले. काटा- किन्हीराजा मार्गावर पुन्हा वृक्ष कोसळल्याने वाहतूकही खोळंबली होती. नुकसानाचे पंचनामे तातडीने करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी केली जात आहे.