वाशिम जिल्ह्यात हेल्मेट सक्ती कायद्याच्या अंमलबजावणीस खीळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 15:51 IST2019-01-16T15:50:51+5:302019-01-16T15:51:55+5:30
या मोहिमेला पुन्हा खीळ बसली असून नागरिकांसोबतच प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांमधूनही ‘हेल्मेट’ वापराबाबत उदासिनता बाळगली जात असल्याचे दिसून येत आहे.

वाशिम जिल्ह्यात हेल्मेट सक्ती कायद्याच्या अंमलबजावणीस खीळ!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची जिल्ह्यात डिसेंबर २०१८ च्या पहिल्या आठवड्यात काहीअंशी अंमलबजावणी करत ‘हेल्मेट’ परिधान न करता वाहन चालविणाºया ७४ दुचाकीस्वारांकडून उपप्रादेशिक परिवहन विभागाने ६० हजारांच्या आसपास दंड वसूल केला. मात्र, त्यानंतर या मोहिमेला पुन्हा खीळ बसली असून नागरिकांसोबतच प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांमधूनही ‘हेल्मेट’ वापराबाबत उदासिनता बाळगली जात असल्याचे दिसून येत आहे.
रस्त्यांवरील अपघातात होणाºया मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दुचाकी वाहन चालकांसाठी ‘हेल्मेट’ परिधान करणे सक्तीचे केले आहे. मात्र, या निर्णयाची ठोस अंमलबजावणी वाशिम जिल्ह्यात होेणे अशक्य ठरत आहे. मध्यंतरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, पोलीस यंत्रणा, वाहतूक शाखा व अन्य प्रशासकीय यंत्रणांनी दंडात्मक कारवाईची मोहिम हाती घेतली. मात्र, ती काही दिवस सुरू ठेवून पुन्हा बंद करण्यात आल्याने परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे.
अधिकारी, कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचा निर्णय हवेतच विरला
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यासोबतच १ जानेवारी २०१९ पासून जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाºयांना हेल्मेट सक्ती केली जाणार होती. त्यानुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दुचाकीधारक अधिकारी, कर्मचाºयांची माहिती संकलीत करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र प्रशासकीय विभागातील एकाही अधिकारी, कर्मचाºयाने हेल्मेट सक्तीचा कायदा गांभीर्याने घेतलेला नाही. आरटीओ व पोलीस पथक सरकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जाऊन तपासणी करणार होते. त्याची अंमलबजावणीही झाल्याचे कुठे दिसत नाही.
प्रशासकीय विभागात कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांची संख्या यासह अन्य माहिती संकलित करण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात असून फेब्रूवारीच्या सुरूवातीपासूनच सर्वांना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे केले जाणार आहे. याशिवाय नागरिकांनीही स्वसुरक्षेसाठी हेल्मेट परिधान करण्याबाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
- जयश्री दुतोंडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम.