वाशिम : भरधाव पिकअपने उडवले, एक जण जागीच ठार
By नंदकिशोर नारे | Updated: July 9, 2024 16:05 IST2024-07-09T16:05:04+5:302024-07-09T16:05:29+5:30
ड्रंक ॲण्ड ड्राइव्हचा रिसोड-मेहकर मार्गावर मोठेगाव बस स्टॉपनजीक थरार

वाशिम : भरधाव पिकअपने उडवले, एक जण जागीच ठार
वाशिम : मद्य प्राशन करून भरधाव वेगाने पिकअप वाहन चालकाने धडक दिल्याने एका विवाहित युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना ८ जुलै रोजी रात्री आठ वाजता रिसोड मेहकर मार्गावर मोठेगावच्या बसस्टॉपनजीक ८ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. नारायण परबत कष्टे (वय २८ वर्षे, रा. मोठेगाव), असे मृतकाचे नाव असून, त्याच्यासोबत असलेल्या दोघा-तिघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी पिकअप चालक सचिन कौतिक मुकीर, रा. जांभूळ, ता. लोणार, जि. बुलढाणा यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सचिन कौतिक मुकीर हा एम.एच. २८ व्ही.व्ही. ६५८३ क्रमांकाच्या पिकअप वाहनाने रिसोडकडून मेहकरच्या दिशेने निघाला होता. सचिन मुकीर हा मद्य प्राशन करून बेधुंद अवस्थेत वाहन चालवत होता. रात्री आठ वाजता त्याने भरधाव वेगाने निष्काळजीपणे वाहन चालवून नारायण कष्टे यास जबर धडक दिली. या धडकेत नारायण कष्टे याचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर पिकअप वाहनही काही अंतरावर जाऊन पलटी झाले. याबाबतची माहिती मिळताच बस स्टॉपवर जमलेल्यांसह गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पिकअप चालक सचिन मुकीर यास ताब्यात घेतले. अपघातात ठार झालेला नारायण कष्टे हा अत्यंत गरीब हलाखीच्या परिस्थितीत होता. त्याच्यामागे पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे. दरम्यान, वाहन चालकास कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी मोठेगाव येथील ग्रामस्थांनी रिसोड पोलिस स्टेशनमध्ये धडक दिली होती. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी आराेपी पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला आहे.