वाशिम जिल्ह्यात २८६१ उमेदवारांनी दिली महाराष्ट्र गट-क पूर्वपरीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 18:26 IST2018-06-10T18:26:26+5:302018-06-10T18:26:26+5:30
वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट-क पूर्व परीक्षा २८६१ उमेदवारांनी १० जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ या दरम्यान वाशिम शहरातील दहा परीक्षा उपकेंद्रांवर दिली.

वाशिम जिल्ह्यात २८६१ उमेदवारांनी दिली महाराष्ट्र गट-क पूर्वपरीक्षा
वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट-क पूर्व परीक्षा २८६१ उमेदवारांनी १० जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ या दरम्यान वाशिम शहरातील दहा परीक्षा उपकेंद्रांवर दिली. एकूण ३५९१ उमेदवारांची नोंदणी झाली होती. त्यापैकी ७३० उमेदवार गैरहजर होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट-क पूर्व परीक्षा -२०१८ ही रविवार १० जून २०१८ रोजी वाशिम शहरातील दहाही परीक्षा उपकेंद्रावर घेण्यात आली. परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते. या पूर्व परीक्षेसाठी एकूण ३५९१ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८६१ उमेदवारांनी परीक्षा दिली असून, उर्वरीत ७३० उमेदवार गैरहजर होते. शहरातील राजस्थान महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर ३६९, श्री शिवाजी हायस्कूल येथे ३४१, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा येथे २५७, बाकलीवाल विद्यालय येथे २५७, एस.एम.सी. इंग्लिश स्कूल येथे ३७१, तुळशीराम जाधव महाविद्यालय येथे ३२२, हॅपी फेसेस स्कूल येथे ३७०, जवाहर नवोदय विद्यालय येथे १८४, शासकीय तंत्र निकेतन येथे १९४ व श्रीमती मालतीबाई सरनाईक कन्या शाळा या परीक्षा केंद्रावर १९६ उमेदवारांनी परीक्षा दिली. दरम्यान, परीक्षेला येताना सोबत ओळखीचा पुरावा म्हणून कोणतीही दोन कागदपत्रे घेऊन येण्याच्या लेखी सूचना दिल्या होत्या. काही उमेदवारांनी ओळखीचा एक पुरावा आणल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. हा प्रकार वरिष्ठांपर्यंत गेल्याने कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून ओळखीच्या एका पुराव्यावरदेखील उमेदवारांना परीक्षेला बसू देण्यात आले. काही उमेदवारांना याची कल्पना नसल्याने ते परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.