‘वार्ड’ पद्धती नगरसेवकांच्या सोयीची
By Admin | Updated: December 25, 2014 02:04 IST2014-12-25T02:04:43+5:302014-12-25T02:04:43+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत बदल : प्रभाग पद्धतीवर शासनाची फुली.

‘वार्ड’ पद्धती नगरसेवकांच्या सोयीची
वाशिम : राज्यात सत्तारूढ झालेल्या भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाय रोवण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्याच पृष्ठभूमिवर नगरपालिकांच्या निवडणुकीत सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या प्रभाग पद्धतीवर फुली मारून पुन्हा एकदा वार्ड पद्धत सुरू करण्याची तयारी महायुतीच्या सरकारने चालविली आहे. वार्ड पद्धतीमुळे पालिकांच्या निवडणुकीत होणारा अव्वाच्या सव्वा खर्च थोपविता येणार असून, ही पद्धत राजकारण्यांच्या सोयीची असल्याचा सूर राजकारण्यांमधून निघत आहे.
सन २00१ पर्यंत राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका वार्ड पद्धतीने घेण्यात येत होत्या; मात्र सन २00१ मध्ये शासनाने प्रभाग पद्धत जन्माला घातली होती. त्यावेळी तीन वार्डांचा मिळून एक प्रभाग निर्माण करण्यात आला होता, त्यामुळे स्वाभाविकच एका प्रभागाचे प्रतिनिधीत्व तीन नगरसेवक करीत होते. राजकारणांमधील स्थित्यंतरातून सन २00६ मध्ये पुन्हा शासनाने प्रभाग पद्धतीला मूठमाती देऊन वार्ड पद्धतीनुसारच पालिकेच्या निवडणुका घेतल्या होत्या; परंतु सन २0११ च्या नगरपालिका निवडणुकीत तत्कालीन कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारने पुन्हा एकदा प्रभाग पद्धत सुरू केली होती. यावेळी एका प्रभागातील मतदारांना चार नगरसेवक निवडण्याचा अधिकार बहाल करण्यात आला होता; मात्र राज्यात नव्यानेच सत्तारूढ झालेल्या भाजप व शिवसेनेच्या महायुती सरकारने पुन्हा एकदा प्रभाग पद्धतीला मूठमाती देऊन वार्ड पद्धत सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नगरपालिकांच्या आगामी निवडणुका वार्ड पद्धतीनेच होणार असल्याचे जवळपास निश्चित मानल्या जात आहे.