वाकद पं. सं. पोटनिवडणुकीत वंचित-जनविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:45 IST2021-09-27T04:45:46+5:302021-09-27T04:45:46+5:30
रिसोड : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोट निवडणुकीत जनविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीत युती झाली असली तरी रिसाेड ...

वाकद पं. सं. पोटनिवडणुकीत वंचित-जनविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत
रिसोड : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोट निवडणुकीत जनविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीत युती झाली असली तरी रिसाेड तालुक्यातील वाकद पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीत जनविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीने आपापले उमेदवार रिंगणात ठेवले आहेत. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही आघाड्यांची मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे दिसत आहे.
वाकद पंचायत समिती गणाच्या पोट निवडणुकीत जनविकास आघाडी, वंचित, राष्ट्रवादी, शिवसेना या प्रमुख पक्षांदरम्यान लढत होत आहे. मागील निवडणुकीत या सर्कलमधून जनविकास आघाडीच्या द्वारकाबाई अशोक कुलाळ या विजयी झाल्या होत्या, परंतु ओबीसी प्रवर्ग आरक्षणामुळे ही जागा रद्द झाल्यामुळे याठिकाणी आता पुन्हा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मात्र केवळ वाकद पंचायत समितीत मैत्रीपूर्ण लढत असून, या लढतीमध्ये वंचित पक्षाकडून वंचित पक्षाचे रिसोड तालुकाध्यक्ष सय्यद अकील यांच्या पत्नी तर जनविकास आघाडीने पुन्हा जुना चेहरा म्हणून द्वारकाबाई कुलाळ यांना समोर केले आहे. या उलट राष्ट्रवादीकडून केसरबाई दिनकरराव हाडे, तर शिवसेनेकडून रूपाली श्रीराम देशमुख या आपल्या उमेदवारी कायम ठेवणार आहेत. वाकद पंचायत समितीचा इतिहास बघता आतापर्यंत या ठिकाणी माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या पक्षाच्या उमेदवाराला बहुतेक निवडणुकीत अधिक पसंती मिळाली आहे. परंतु, या निवडणुकीत कामाचा लेखाजोगा बघता तसेच नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी विविध आंदोलने विविध कामांसाठी रस्ता रोको यासारखे ठोस निर्णय वंचित आघाडीकडून घेतल्यामुळे त्यांचे उमेदवारही या निवडणुकीत जोमाने उतरले आहेत.