गारपीटग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: April 17, 2015 01:46 IST2015-04-17T01:46:23+5:302015-04-17T01:46:23+5:30

शासनाकडे अहवाल सादर; वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी मागणी केलेला निधी प्रलंबित.

Waiting for the hailstorm farmers | गारपीटग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

गारपीटग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

कारंजा लाड : जिल्ह्यात ३१ डिसेंबर २0१४ च्या मध्यरात्री अर्थात नववर्षाच्या प्रारंभीच वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने कारंजा, मंगरुळपीर आणि मालेगाव तालुक्यातील चार हजारांहून अधिक हेक्टरमधील विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. तब्बल दहा हजारांवर शेतकर्‍यांना या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. यासंदर्भात प्रशासकीय स्तरावरून सर्वेक्षण करण्यात आला आणि अहवाल महसूल विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाने या अहवालावरून नुकसानग्रस्तांसाठी निधीची मागणी केली; परंतु तीन महिने उलटूनही अद्याप गारपिटग्रस्तांना शासनाकडून कोणत्याच प्रकारची मदत जाहीर झाली नाही. यंदा राज्यातील शेतकर्‍यांवर निसर्गाची मोठी अवकृपा होत असून, खरिपात अवर्षणामुळे हवालदील झालेल्या शे तकर्‍याला यंदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने वेळोवेळी तडाखा देणे चालविले आहे. गतवर्षाच्या अखेरीस ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री जिल्ह्यातील कारंजा, मालेगाव, मंगरुळपीर या तीन तालुक्यांत वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. शासनाच्या नियमानुसार करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये मालेगाव तालुक्यात तीन हजारांवर, कारंजा तालुक्यात ११८0 हेक्टर, तर मंगरुळपीर तालुक्यात २५ हेक्टर क्षेत्रासह तिन्ही तालुक्यांतील मिळून एकूण ४२४३.0४ हेक्टरवरील गहू, हरभरा, तूर, फळपिके, तसेच इतर पिकांचे ५0 टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. या नैसर्गिक आपत्तीचा फटका एकूण १0४९७ शेतकर्‍यांना बसला. महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. तिन्ही तालुक्यातील महसूल विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालाचे निरीक्षण करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने हा अहवाल राज्य शासनाच्या संबंधित विभागाच्या आयुक्तांकडे सादर करून शेतकर्‍यांसाठी आर्थिक निधीची मागणीही करण्यात आली. तथापि, तीन महिने उलटूनही अद्याप शासनाकडून आर्थिक मदत मिळू शकली नाही. त्यानंतर जानेवारी महिन्यात ९ आणि ११ तारखेला पुन्हा मंगरुळपीर, मानोरा आणि कारंजा या तीन तालुक्यांत मिळून पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसल्याने १५ हजार शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यास काही दिवस उलटत नाही तोच जिल्ह्यात गत आठवड्यात मोठय़ा प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गार पीट आल्याने शेतकर्‍यांचे पुन्हा एकदा अतोनात नुकसान झाले. राज्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीचा वारंवार सामना करीत असताना आणि शासनाने त्याचा विचार करून त्वरित आर्थिक मदत घोषित करणे आवश्यक असताना ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या गारपिटीला तीन महिने उलटले तरी शासनाने अद्यापही शेतकर्‍यांना आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. पुढच्या महिन्यात मशागतीची कामे सुरू होतील. त्यासाठी पैसा नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Web Title: Waiting for the hailstorm farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.