माळेगाव ग्रामपंचायतीत केवळ एकाच जागेसाठी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:44 IST2021-01-13T05:44:58+5:302021-01-13T05:44:58+5:30
राज्य निवडणूक आयोगाने १ एप्रिल ते ३० डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. ...

माळेगाव ग्रामपंचायतीत केवळ एकाच जागेसाठी मतदान
राज्य निवडणूक आयोगाने १ एप्रिल ते ३० डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यात कारंजा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. या ग्रामपंचायतीत सात सदस्यांची निवड करावी लागणार होती. ही ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी गावकरी आणि लोकप्रतिनिधींनी पुरेपूर प्रयत्न केला. त्यामुळे सातपैकी सहा जागा बिनविरोध झाल्या; परंतु एका जागेसाठी पुष्पा वसंतराव सोनोने आणि रेखा सुधीर माने या दोन महिला उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या एकाच जागेसाठी निवडणूक विभागाला मतदान घ्यावे लागणार आहे. यासाठी कारंजा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, माळेगाव येथील बिनविरोध झालेल्या उमेदवारांत ग्रामविकास पॅनलमधील शीला प्रकाश घाडगे, सुवर्णा माणिक वाघ, राजकुमार हरिचंद्र वानखडे, शालिनी सुधाकर भोंडे, पवन बाळू काळे, प्रदीप बबनराव कदम यांचा समावेश आहे.
--------
समजूत काढण्यात लोकप्रतिनिधी अपयशी
माळेगाव ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी आणि गावात खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामपंचायत सदस्यांची निवड होऊन गावविकासाला चालना मिळावी, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुरेपूर प्रयत्न केले. त्यामुळे सहा जागा बिनविरोध करणे त्यांना शक्यही झाले; परंतु एका जागेवर रिंगणात असलेल्या दोन महिला उमेदवारांपैकी कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याने ग्रामपंचायत बिनविरोध करणे त्यांना शक्य झाले नाही.