मुलींचा जन्मदर सर्वाधिक असणाऱ्या गावांचा होणार सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 15:38 IST2021-02-04T15:38:29+5:302021-02-04T15:38:52+5:30
Save Girl Child News एक हजारापेक्षा अधिक मुलींचा जन्मदर असणाºया गावांचा सन्मान केला जाणार आहे.

मुलींचा जन्मदर सर्वाधिक असणाऱ्या गावांचा होणार सन्मान
वाशिम : जिल्ह्यात बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान राबविण्यात येत असून, एक हजारापेक्षा अधिक मुलींचा जन्मदर असणाºया गावांचा सन्मान केला जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला सूचना दिल्या आहेत.
स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे, मुलीच्या जन्माचे स्वागत करणे, स्त्री भ्रूण हत्या टाळणे, मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे यासाठी बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान राबविण्यात येते. या अभियानात वाशिम जिल्ह्याचा समावेश असून, विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गत तीन वर्षात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याने जिल्ह्यात दर हजारी मुलामागे मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. २०२० मध्ये दर हजारी मुलामागे ९४० च्या वर मुलीच्या जन्मदराचे प्रमाण आहे. ज्या गावांमध्ये मुलींचा जन्मदर गेल्या काही वर्षात १ हजारापेक्षा अधिक आहे, अशा गावांचा सन्मान केला जाणार आहे. यासाठी गावपातळीवर ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आदींची मदत घेतली जाणार आहे.