भाजीपाल्याच्या दरात वाढ सुरूच; गृहिणींचे बजेट घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 15:52 IST2020-11-09T15:52:06+5:302020-11-09T15:52:21+5:30
Washim News भाज्यांचे दर दुपटीनेच वाढल्यामुळे गृहिणी अडचणीत सापडल्या आहेत.

भाजीपाल्याच्या दरात वाढ सुरूच; गृहिणींचे बजेट घसरले
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या मागणीत सतत वाढ सुरू आहे. त्यात कडधान्याच्या दरातील वाढही कायम असून, बहुतांश डाळीचे दर १०० ते १२० रुपये प्रती किलो असल्याचे दिसून आले. त्यामुळे स्वयंपाक घरातील गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. याचा फटका भाजीपाल्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठी घट आली. परिणामी फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात डाळींचे दरही १२० रुपये प्रती किलोच्या घरात पोहोचले आहेत. या सगळ्यामुळे आता सामान्य घरातील गृहिणींचे बजेट कोलमडलेलेच आहे. जिल्ह्यात फुलकोबी १२० रुपये, वांगी ६० ते ८० रुपये, मेथी ८० रुपये, पालक ६० रुपये, दाेडके ६० रुपये, कोथिंबीर २०० रुपये, हिरवी मिरची ८० रुपये, कारली ८० ते १०० रुपये, बटाटे ६० रुपये, कांदे ६० ते ८० रुपये, लसूण १६० रुपये प्रति किलोदराने मिळत आहे. इतरही भाज्यांचे दर दुपटीनेच वाढल्यामुळे गृहिणी अडचणीत सापडल्या आहेत.
प्रत्येकच भाजी महागली आहे. डाळींचे दर, तर १२० रुपयांपेक्षा अधिक असल्याने स्वयंपाक घराचे बजेटच कोलमडले आहे. भाजीसाठीच मोठा खर्च करावा लागतो.
- संगीता इंगोले,
गृहिणी, वाशिम
परतीच्या पावसाने भाजीपाल्याचे नुकसान झाले, त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली बाजारात दर वाढले तरी आम्हाला मात्र त्याचा फायदा नाही.
- संतोष भोजापुरे,
उत्पादक, इंझोरी