वाशिममध्ये पुन्हा अवकाळी पाऊस; २६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By संतोष वानखडे | Updated: May 3, 2023 17:36 IST2023-05-03T17:33:11+5:302023-05-03T17:36:30+5:30
मार्च महिन्यात १४ ते २० आणि ३१ तारखेला अवकाळी पाऊस, गारपिट झाल्याने कांदा, हळद यांसह फळबाग व भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले होते.

वाशिममध्ये पुन्हा अवकाळी पाऊस; २६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
वाशिम : उन्हाळ्यातही जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळवारा व गारपिटीचा मुक्काम वाढला असून, मंगळवारी (दि.२) वाशिम, कारंजा, रिसोड, मालेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली. एका दिवसात २६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्रीनंतरही सर्वदूर अवकाळी पाऊस झाल्याने पीक नुकसानाची व्याप्ती वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
मार्च महिन्यात १४ ते २० आणि ३१ तारखेला अवकाळी पाऊस, गारपिट झाल्याने कांदा, हळद यांसह फळबाग व भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर ६, ८, २५, ३० एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा, हळद, भाजीपाला व फळबागेचे नुकसान झाले. मे महिन्यातही अवकाळी पाऊस व गारपिटीचा कहर सुरूच असून, २ मे रोजी दिवसा वाशिम, कारंजा, रिसोड, मालेगावात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. मध्यरात्रीनंतर सुमारे एक ते दीड तास अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.
अवकाळी पाऊस व गारपिटीने वाशिम तालुक्यात ५७.३० हेक्टरवरील पेरू, भाजीपाला,मुंग,कांदा, ज्वारी पिकाचे,रिसोड तालुक्यात ५८ हेक्टरमधील भाजीपाला व कांदा, मालेगाव तालुक्यात ११.८० हेक्टरमधील मुंग व कांदा, कारंजा तालुक्यात १४०.२० हेक्टरमधील भाजीपाला,मुंग, कांदा,भूईमुग, गहु, ज्वारी,निंबू,केळी,संत्रा,तीळ या शेतपीकाचे नुकसान झाल्याची व मौजे शेवती येथील दोन विहिरी खचल्याची प्राथमिक माहिती आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले असून, शासनाने वाढीव निकषानुसार नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी ३ मे रोजी केली.