मालेगाव तालुक्यात विनापरवाना वृक्षतोड !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 15:45 IST2019-05-10T15:45:40+5:302019-05-10T15:45:50+5:30
मालेगाव तालुक्यात अवैध मार्गाने वृक्षतोड करून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक केल्या जात आहे.

मालेगाव तालुक्यात विनापरवाना वृक्षतोड !
मालेगाव : मालेगाव तालुक्यात अवैध मार्गाने वृक्षतोड करून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक केल्या जात आहे. या प्रकाराकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्यालगतची झाडे तोडण्याचे प्रकार वाढीस लागतात. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या बुंध्याला आग लावून झाडांची अवैध तोड केली जाते. आता तर वनविभागाची कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता रस्त्याच्या दुतर्फाची झाडे सर्रास तोडली जात आहे.
लाकडाच्या व्यवसायात मोठा नफा असल्याने तालुक्यात अवैध लाकुड माफीया सक्रीय झाल्याचे दिसून येते. सदर माफीया शेतकºयांच्या शेतातील, रस्त्यालगतचा वन संरक्षित भाग, रस्त्याच्या कडेची झाडे तोडत असल्याचे दिसून येते. संरक्षित वन परिसरातील वृक्षाचे रक्षण करणे व अवैध वृक्षतोड थांबवणे, अवैध लाकूड वाहतुकीवर कारवाई करणे वनविभागाकडून अपेक्षित आहे. तालुक्यातील अनेक रस्त्यालगची झाडे भरदिवसा कटाई केल्या जात आहेत. एकीकडे राज्य सरकार ५० कोटी वृक्ष लागवड योजनेवर भर देत आहे तर दुसरीकडे अवैध वृक्षतोड होत असतानाही वनविभाग कारवाई करीत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.