पांगरी कुटे परिसरात बंदुकीच्या गोळ्या झाडून अज्ञात इसमाची हत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:41 IST2021-09-13T04:41:02+5:302021-09-13T04:41:02+5:30
वाशिम : बंदुकीच्या गोळ्या झाडून एका ३२ वर्षीय इसमाची हत्या झाल्याची घटना नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील पांगरी कुटे (ता. मालेगाव) ...

पांगरी कुटे परिसरात बंदुकीच्या गोळ्या झाडून अज्ञात इसमाची हत्या!
वाशिम : बंदुकीच्या गोळ्या झाडून एका ३२ वर्षीय इसमाची हत्या झाल्याची घटना नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील पांगरी कुटे (ता. मालेगाव) गावानजीकच्या शेतात १२ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपास सुरू केला. दरम्यान, मृतक अनोळखी असल्याने या घटनेचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
पांगरीकुटे शेत शिवारात रस्त्यालतच्या एका शेतात अंदाजे ३३ वर्षीय इसमाचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची माहिती मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण धुमाळ यांना मिळाली. या माहितीच्या आधारे आपल्या ताफ्यासह ठाणेदार धुमाळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ व मृतदेहाची पाहणी केली असता, मृतकाच्या कपाळावर आणि छातीत बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. मृतक अनोळखी असल्याने त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. ही हत्या का, कधी व कुणी केली, हत्येमागील कारणांचा उलगडा करण्याकामी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. ठसे तज्ज्ञ, श्वानपथकालादेखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले. दरम्यान, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस.एम. जाधव आदींनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. कपाळावर बंदुकीची गोळी झाडल्याने मृतकाचा चेहरा स्पष्ट ओळखू येत नाही. इसमाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास मालेगाव पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहे.
०००००००००००
मृतकाच्या छातीवर टॅटू
मृतकाच्या छातीच्या डाव्या भागावर ‘एमआर लव दिल’ असलेला टॅटू आहे. मृतकाची ओळख पटली नसल्याने तपासासाठी कोणतीही प्राथमिक माहिती यंत्रणेला मिळू शकली नाही. मृतक हा जिल्ह्यातील रहिवासी आहे किंवा जिल्ह्याबाहेरील आहे, आरोपी नेमके कोण, आदी बाबींचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
०००००
घटनेचा तपास सुरू
पांगरी कुटे परिसरात आढळून आलेला मृतदेह कुणाचा, या घटनेतील आरोपी कोण या अनुषंगाने पोलीस पथकाने तपास हाती घेतला आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर तपास कार्याला गती येईल, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.