Two-wheeler theft in various parts of the city including Ganeshpeth, Dande Chowk area | शहरातील गणेशपेठ, दंडे चौक परिसरासह शहराच्या विविध भागांमध्ये दुचाकी चोरी

शहरातील गणेशपेठ, दंडे चौक परिसरासह शहराच्या विविध भागांमध्ये दुचाकी चोरी

मागील काही दिवसांपासून वाशिम शहराच्या विविध भागांमध्ये दुचाकी चोरीसह दुचाकीचे महत्त्वाचे साहित्य व बॅटऱ्या, चारचाकी वाहनांचे साहित्य व बॅटऱ्या आणि इतर गृहोपयोगी साहित्याच्या अनेक चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील १५ दिवसांच्या कालावधीमध्ये शहरातील गणेशपेठ व दंडे चौक परिसरात जुन्या बालाजी मंदिर परिसरातील काही दुचाकीच्या बॅटऱ्या चोरीस गेल्याच्या घटना घडल्या. एवढेच नव्हे तर अनेक दुचाकीच्या पेट्रोलचीही चोरी सुरू असल्यामुळे या भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. काही चारचाकी वाहनांच्या बॅटऱ्यासुद्धा चोरीस गेल्याचे समजते. या सर्व छोट्या-मोठ्या चोरीसह या भागात सक्रिय असलेले चोरटे घरातील साहित्याची सुद्धा चोरी करत असल्याच्या घटनांमुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत. या सर्व प्रकाराबाबत या भागातील नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रारी देऊनही आजपर्यंत शहर पोलिसांनी चोरट्यांना पकडण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याची खंत या भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

वाशिम शहर पोलिसांनी शहरातील भुरट्या चोरांचा त्वरित बंदोबस्त लावावा, रात्रीची गस्त वाढवावी, दंडे चौक, गणेशपेठ भागांमध्ये, जुन्या नगर परिषदेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणीसुद्धा या भागातील नागरिकांनी केली आहे.

----------------------

जुन्या नगर परिषदेच्या आवारामध्ये चोरट्यांचा ‘अड्डा’

नगर परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये सध्या शुकशुकाट असल्यामुळे शहरातील छोट्या-मोठ्या चोऱ्या करणारे अनेक भुरटे चोर सध्या जुन्या नगर परिषदेच्या आवारामध्ये बसून चोरीची सूत्रे चालवितात. एवढेच नव्हे तर चोरून आणलेल्या साहित्याची, चोरीचा माल घेणाऱ्या संबंधित दुकानदारास तो ‘माल’ विकून मिळालेल्या पैशातून हे चोरटे जुगार, पत्ते, तितली भवरा, वरली-मटका, गांजा, दारू व इतर शौकामध्ये खर्च करीत असल्याचीही चर्चा आहे. शहर पोलिसांनी या भुरट्या चोरट्यांना पकडण्यासाठी एक पथक नेमून नगर परिषदेच्या जुन्या इमारतीमधील चोरट्यांचा अड्डा त्वरित उद्‌ध्वस्त करावा, अशी मागणीही गणेशपेठ, दंडे चौकातील त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.

बॉक्स घेणे

नगर परिषदेच्या शाळांमध्ये रात्रीच्या वेळेस चालतात अवैध धंदे

शहरातील काही ठिकाणी असलेल्या नगर परिषदेच्या शाळेचे आवार व मुख्य गेट उघडेच असल्यामुळे या संधीचा फायदा घेऊन असामाजिक तत्त्वाकडून या ठिकाणचा अवैध धंद्यासाठी वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. या शाळांच्या परिसरात कोणताच चौकीदार नसल्याची संधी साधून तसेच मुख्यद्वार उघडेच असल्यामुळे अनेक असामाजिक तत्त्वांकडून या जागेचा दारू पार्ट्या, जुगार, पत्ते आदींसाठी वापर केला जात आहे. सध्या कोरोनामुळे शाळा अनेक महिन्यांपासून बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक ठिकाणच्या सरकारी शाळांच्या परिसराचा वापर असामाजिक तत्त्वांकडून गैरमार्गासाठी केला जात आहे. नगर परिषदेने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन संबंधित शाळांच्या मुख्यद्वाराला कुलूप लावण्यासह परिसरात चौकीदारही नेमण्याची मागणी होत आहे.

Web Title: Two-wheeler theft in various parts of the city including Ganeshpeth, Dande Chowk area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.