‘तंटामुक्त’ १५ ग्रामपंचायतींसाठी २९ लाखांची रक्कम!
By Admin | Updated: April 17, 2017 02:26 IST2017-04-17T02:26:32+5:302017-04-17T02:26:32+5:30
वाशिम: महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायती तंटामुक्त गाव पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत.

‘तंटामुक्त’ १५ ग्रामपंचायतींसाठी २९ लाखांची रक्कम!
वाशिम: महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायती तंटामुक्त गाव पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत. या ग्रामपंचायतींसाठी पुरस्काराची २९ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली असून, आॅनलाइन प्रणालीद्वारे ही रक्कम ग्रामपंचायतींना वितरित केली जाईल, असे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी रविवारी सांगितले.
तंटामुक्त गाव पुरस्कारास पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतीमध्ये वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावंगा जहांगीर व रिठद, रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत एकलासपूर, आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत इचोरी, कळंबा बोडखे, चिखलागड व फाळेगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धानोरा घाडगे (बु.), वरोली व सावळी, मंगरूळपीर पोलीस स्टेशन अंतर्गत जोगलदरी, जुनापानी यासह जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत कार्ली, किनखेडा, हनवतखेडा व सोनाळा वाकापूर या ग्रामपंचायती तंटामुक्त गाव पुरस्कारास पात्र ठरल्या आहेत. तंटामुक्त गाव पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींकरिता एकूण २९ लाख रुपये बक्षिसांची रक्कम प्राप्त झाली आहे. ही रक्कम आॅनलाइन प्रणालीद्वारे संबंधित ग्रामपंचायतींना वितरित केली जाणार आहे. याकरिता ग्रामपंचायतींना बँकेचे नाव, खाते क्रमांक व आयएफएससी कोड आदी माहिती तत्काळ संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे द्यावी लागणार आहे, असेही होळकर यांनी सांगितले.